सर्वसामान्य हवालदिल
। नवीन पनवेल । प्रतिनिधी ।
स्वत:चे हक्काचे घर असावे, ही प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यानुसार आयुष्यभर व्यक्ती धडपडत असतो. कुणी लवकर, तर कुणी उशिरा घरांचे बांधकाम करतो. परंतु, कोरोनाकाळापासूनच बांधकाम साहित्याच्या किमती वधारल्याने घराचे स्वप्नही आता महागले आहे. लोखंड, सिमेंट व अन्य बांधकाम साहित्य वाढल्याने महागाईत घर बांधकाम कसे करणार, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे. गेल्या पाच वर्षांत दुप्पट वाढले भाव असून,सध्या एक हजार विटांचा भाव बाजारात वर्ष लहान विट 8000 तर ठोकळा (मोठ्या)विट 14 ते 15 हजार असा झालेला आहे.
पनवेल परिसरात आठ रुपयांना लहान वीट आणि 14 ते 15 रुपयाना ठोकळा वीट ग्राहकाला पडते. वीटभट्टीचे प्रमाण गेल्या काही वर्षात कमी झाल्याने साहजीकच वीटाची कमतरता जाणवू लागली आहे. बांधकाम साहित्याच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यातही मजुरी सुद्धा वाढत आहे. त्यामुळे घर बांधकामाचे स्वप्न महाग होत चालले आहे. आणखी दर वाढल्यास घर बांधणेच कठीण होईल. वीट निर्मितीची मजुरी वाढली आहे. त्यातच पेट्रोल आणि डिझेलचाही दर वाढल्याने वीटनिर्मितीच महागली आहे. सहाऐवजी आता 12 टक्के जीएसटी झाल्यामुळे आता विटा किती रुपयात विक्री कराव्यात हा प्रश्न भेडसावत असल्याचचे एका वीट व्यावसायिकाने सुचित केले.
12 टक्के जीएसटी
केंद्र शासनाने 1 एप्रिलपासून 6 ऐवजी 12 टक्के जीएसटी मातीच्या विटांवर लागू केले आहे. त्यामुळे तहसील कार्यालयात वीटभट्टीची नोंदणी करण्याकरिता जाणार्या व्यावसायिकांना आता 12 टक्के जीएसटीची रक्कम भरावी लागणार आहे. त्यामुळे व्यावसायिक विटांचेही दर वाढवू शकतो.