| पनवेल | प्रतिनिधी |
गोव्याच्या दिशेने पनवेलकडे येणाऱ्या रस्त्यावर श्री बालाजी हॉटेलसमोर कंटेनरने धडक दिल्याने टेम्पोचालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी कंटेनरचालकाविरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंटेनर क्रमांक एमएच-04 एचवाय-5330 हा चालकाच्या ताब्यात होता. संबंधित कंटेनर चालकाने रस्त्याच्या डाव्या बाजूला धोकादायक पद्धतीने वाहन वळविताना कोणताही इंडिकेटर न लावल्याचा आरोप आहे. त्याचवेळी मागून येणाऱ्या एमएच-46 बीएफ-9944 क्रमांकाच्या टेम्पोला कंटेनरची धडक बसली. या अपघातात टेम्पोचालक दशरथ बाबुराव मुंडे (46) यांना गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलीस नोंदीत नमूद आहे. या घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी सुनील दिनेश पाठक (38) व्यवसाय-ड्रायव्हर यांच्या तक्रारीवरून पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुनील सरगर करीत आहेत.
कंटेनरच्या धडकेत टेम्पो चालकाचा मृत्यू
