खचलेल्या मोरीवर तात्पुरती मलमपट्टी

| गुहागर | प्रतिनिधी |

गुहागर तालुक्यातील कोतळूक येथे मोरी खचली होती. यावरून ग्रामपंचायत सदस्य सचिन ओक यांनी वृत्तपत्रातून लक्ष वेधून खडा सवाल करत आपत्ती व्यवस्थापन प्रमुख म्हणून गुहागर तहसिलदार परिक्षीत पाटील, गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांच्याकडे संबंधित विभागाला सूचना देण्याची मागणी केली होती. त्यानुसार तातडीने गुहागर तहसिलदार, गटविकास अधिकारी यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना करत तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

खचलेल्या मोरीच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभाग गुहागरचे शाखा अभियंता योगेश थोरात यांनी पाहणी करून बांधकाम विभागाच्या वतीने कामगारांकडून तात्पुरती मलमपट्टी करून वाहनचालकांना तात्पुरता दिलासा दिला आहे. पावसाळा सुरू असल्याने कायमस्वरूपी उपाययोजना करता येत नसली तरी याठिकाणी पुन्हा मोरी खचण्याचा प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या मोरीच्या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे ग्रामपंचायत सदस्य सचिन ओक यांनी सांगितले असून तशी मागणी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.

दरम्यान, गुहागर तहसिलदार परिक्षित पाटील, गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांनी तातडीने गांभीर्याने लक्ष देऊन उपाययोजना करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल कोतळूक सरपंच प्रगती मोहिते, ग्रामपंचायत सदस्य सचिन ओक, नियमित वाहन चालक, ग्रामस्थ यांच्याकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Exit mobile version