ताम्हिणी घाटात टेम्पोचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू

दोघे जण जखमी; टेम्पोचे मोठ्याप्रमाणावर नुकसान

। माणगाव । प्रतिनिधी । 

माणगाव-पुणे रस्त्यावरून भरधाव वेगाने येणारा आयशर टेम्पो ताम्हिणी घाटात कोंडेथर गावच्या हद्दीत उलटून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू  होऊन २ जण जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी (दि.19) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडला.

अपघातबाबत मिळालेली माहिती अशी की, आयशर टेम्पो (एमएच-12-आरएन-2499) चालक चंद्रकांत हनुमंत भोसले (51) रा. दरेकरवाडी-पुणे, श्रीराम तात्याबा भायगुडे (56) रा. उंद्रे वस्ती-पुणे व महेश बाळू कांबळे (35) रा. कोळवाडी-पुणे हे माणगाव बाजूकडे येत असताना चालकाने गाडी अति वेगाने चालविल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटला. याचवेळी ब्रेक फेल झाल्याने गाडी घाटाच्या वळणावर उलटून अपघात घडला. या अपघातात गाडीच्या टपावर बसलेले  महेश कांबळे हे गंभीर जखमी झाले. त्यांना औषोधोपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्‍यांचा मृत्‍यू झाला. तर, चालक चंद्रकांत भोसले व श्रीराम भायगुडे हे दोघे जखमी होऊन गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. अपघाताच्या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भॊसले हे करीत आहेत.

Exit mobile version