पिसाळलेल्या कुत्र्यांचा दहा जणांना चावा

| सुधागड-पाली | वार्ताहर |

पाली शहरात पिसाळलेल्या, भटक्या व जखमी कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. या कुत्र्यांनी आठवडाभरात आतापर्यंत दहा जणांना चावा घेतला आहे. शिवाय, अनेक भटक्या कुत्र्यांनादेखील पिसाळलेल्या कुत्र्याने चावून जखमी केले आहे.

मागच्या बुधवारी (ता.14) एका दिवसात तब्बल सात जणांना कुत्रा चावला होता. आणि हे सर्व पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात रेबिजचे इंजेक्शन घेण्यासाठी आले होते. एका पिसाळलेल्या काळ्या कुत्र्याने तर पालीत अक्षरशः दहशत पसरवली आहे. हा कुत्रा दिसेल त्याच्या अंगावर धाव घेऊन त्याला चावत होता. इतर कुत्र्यांचा तर त्याने जीवच घेतला. अखेर सोमवारी (ता.19) सकाळी नाईलाजाने या कुत्र्याला मारण्यात आले. मात्र, आता या कुत्र्याने जखमी केलेल्या कुत्रांना रेबिजची लागण होऊन ते पिसाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पालीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पिसाळलेल्या कुत्र्यांमुळे नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत.

येथील हटाळेश्‍वर चौक, बल्लाळेश्‍वर मंदिर परिसर, शाळा, बाजारपेठ, बसस्थानक, बँक ऑफ इंडियाजवळ तसेच सर्व आळ्यांमध्ये तसेच कचरा कुंड्यांजवळ भटके, जखमी व मोकाट कुत्रे झुंडीत फिरत असतात. रात्री व दिवसा देखील हे कुत्रे टोळक्याने फिरतात. एखादा पादचारी किंवा दुचाकी वाहन दिसले की थेट त्यांच्यावर धावून जातात. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पिसाळलेल्या कुत्र्यांमुळे लहान व शाळकरी मुले, वृद्ध आणि महिला यांना रस्त्यावरून चालणे धोक्याचे झाले आहे.

पिसाळलेल्या कुत्र्यांची पालीत अक्षरशः दहशत पसरली आहे. त्यात अनेकांना हे कुत्रे चावले आहेत. परिणामी नगरपंचायत प्रशासनाने या पिसाळलेल्या व भटक्या कुत्र्यांचा योग्य बंदोबस्त करण्याची आवश्यकता आहे.

ललित ठोंबरे, सामाजिक कार्यकर्ते, पाली

सुधागड तालुक्यातील दोन्ही पाली व जांभुळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात अँटी रेबीज इंजेक्शन, तसेच साप व विंचू दंशावरील प्रतिरोधक इंजेक्शनदेखील मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत.

डॉ. शशिकांत मढवी, तालुका वैद्यकीय अधिकारी, सुधागड

पाली नगरपंचायत मोकाट कुत्रे व गुरे यांच्याबाबत लवकरच उपाययोजना हाती घेण्यात येणार आहे.

विद्या येरूणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, पाली
Exit mobile version