तेरेखोल खाडी पर्यटन विकासासाठी ग्रामीण कृषी कटिबद्ध आहे…

माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांचे प्रतिपादन
। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।

बांदा ते आरोंदा या तेरेखोल खाडी पात्राजवळील गावांना पर्यटन उद्योगाचा लाभ देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याची ग्वाही देत ग्रामीण कृषी पर्यटनासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून सांगेलीच्या सरपंचपदी सुवर्णा राऊळ व सातार्डाच्या सरपंचपदी मनिषा जाधव यांची निवड झाली. त्यांच्या सत्कारप्रसंगी त्यांनी उपस्थित जनतेला संबोधित केले.
आपल्या संबोधनात ते म्हणाले की, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विकास निधी पोहोचवण्यासाठी मी सतत प्रयत्नशील राहिलो आहे. सांगेली दशक्रोशीतील 40 गावातील नागरिकांची पुनाजी राऊळ यांच्या नेतृत्वाखाली एक संघटना होती ती कार्यरत करण्याची गरज आहे. ग्रामपंचायत विकासकामांची यादी तयार करायला हवी तसेच शिंरशिंगे पाटगाव रस्ता व्हायला हवा यासाठी मी पाठपुरावा करत आहे.
आमदार केसरकर बोलत होते. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, उपजिल्हा प्रमुख अशोक दळवी, शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, नगरपरिषद शिवसेना गटनेत्या अनारोजीन लोबो, नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, भारती मोरे, माधुरी वाडकर, गजानन नाटेकर तसेच पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख राऊळ यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून सांगेली सरपंच राऊळ व सातार्डा सरपंच जाधव यांची निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ आहे, असे सांगितले.

यावेळी आमदार केसरकर म्हणाले

ते म्हणाले, सातार्डा येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र देखील प्रस्तावित आहे. आपापल्या गावातील विकासकामांची यादी द्या, आमदार म्हणून निश्‍चितच त्या कामांचा पाठपुरावा करू. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे विशेष लक्ष आहे. पर्यटनमंत्री ठाकरे पर्यटन विकासासाठी पुढाकार घेत आहेत. बांदा, कवठणी, सातार्डा, आरोंदा या तेरेखोल नदीपत्राचा वापर हा पर्यटन क्षेत्रासाठी व्हावा यासाठी प्रयत्न आहे. सातार्डा येथील प्रकल्प कार्यान्वित व्हावा, असे कंपनीला निर्देश दिले असून कंपनीने दोन महिन्यांचा अवधी मागितला होता.

शिरशिंगे धरणासाठी प्रयत्नशील

केसरकर म्हणाले, दोडामार्ग तालुक्यांमध्ये दोन हजार कोटींची गुंतवणूक करणारा अम्युझमेंट पार्क प्रकल्प तसेच रेडी, शिरोडा, सातार्डा या भागात रोजगार निर्माण करणारे प्रकल्प व्हावेत. आडाळी एमआयडीसी लवकरच विकसीत व्हावी यासाठी प्रयत्न आहे. शिरशिंगे धरण प्रकल्प दिवाळीनंतर सुरू करण्याचा प्रयत्न असून दिवाळीनंतर प्रत्येक परिसरात भेट देण्याचा प्रयत्न असेल.

Exit mobile version