| बुलढाणा | प्रतिनिधी |
समृद्धी महामार्गावर आज झालेल्या भीषण अपघातात दोन प्रवाशांचा होरपळून दुर्देवी मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी आहे. समृद्धी महामार्गावरील दुसरबीड येथे गुरुवारी सकाळी ही भीषण दुर्घटना घडली.
बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला असून वाहनाचा स्फोट झाला. समृद्धी महामार्गाने सदर कार मुंबईतहुन अकोल्याच्या दिशेने जात होती. नागपूर कॅरिडोरवर चालक अभिजीत अर्जुन चव्हाण (35) यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार मिडीयममधील क्रॅश बॅरिअरला धडकून सदर बॅरियरची पट्टी कार च्या समोरील भागातून घुसून आरपार निघाली. यानंतर कारने तात्काळ पेट घेतला. या अपघातात अकोला येथे बहिणीच्या घरी जात असलेले गणेश सुभाष टेकाळे (40) व राजू महंतलाल जयस्वाल (32), दोन्ही रा. मुंबई यांचा जागेवरच होरपळून मृत्यू झाला. तर चालक अभिजीत हा गंभीर जखमी झाला आहे. आगीच्या ज्वाळा इतक्या भयंकर होत्या की काही मिनिटांतच कार जळून खाक झाली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून, पुढील तपास सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र वाहनात तांत्रिक बिघाड झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिस याबाबत सखोल चौकशी करत आहेत.