उरणच्या आवरे गावावर शोककळा !
| उरण | अजित पाटील |
पनवेल परिसरात मित्रांकडे किंवा नातेवाईकांकडे गेलेल्या दोन जिगरी मित्रांचा परतीच्या प्रवासात झालेल्या भीषण अपघातात जागच्या जागी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नव्यानेच अवघ्या सहा महिन्यांपूर्वी घेतलेल्या आरटीगा गाडीने प्रवास करतांना पळस्पे परिसरात झालेल्या अपघातात आवरे गावातील मोहिंदर श्यामकांत गावंड आणि अलंकार नारायण पाटील या दोघांचा जागच्या जागी मृत्यू झाला. अपघात एवढा भयानक होता की, दोघांच्या ही डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे दिसून येत आहे. या अपघाताने आवरे आजची सकाळ ही अत्यंत वेदनामय झाल्याचे समोर आले आहे. दोन उमदे तरुण या गावाने गमावल्याने गावात हाहाकार उडाला आहे.
उरणच्या आवरे गावातील मोहिंदर गावंड आणि अलंकार पाटील नामक दोघे युवक काल मंगळवारी कोणत्या तरी कामानिमित्त पनवेल भागात गेले होते. रात्रीच्या सुमारास घरी परतत असताना त्यांच्या गाडीला पळस्पे भागात भीषण अपघात झाला. त्यात दोघेही जागच्या जागी ठार झाले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की गाडीच्या समोरच्या भागाचा अक्षरशः चुरा झाला असून या दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यात दोघांचा ही मृत्यू झाला आहे.
अपघातातील मोहिंदर गावंड हा कस्टम क्लिअरिंग एजंट म्हणून काम करीत होता तर अलंकार नारायण पाटील हा पर्ल फ्रेट सर्व्हिसेसमध्ये सुपरवायझर म्हणून नोकरी करीत होता. मोहिंदर गावंड याच्या मागे दोन लहान मुले, पत्नी आणि वडील व तीन भाऊ असा परिवार आहे, तर अलंकार पाटील याला देखील दोन लहान मुले, मोठ्ठा भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे. शालेय जीवनापासून अतिशय जिगरी दोस्त असलेल्या या दोघांचा मृत्यू ही एकत्रित अपघातात एकाच वेळी झाला असल्याने आवरे गाव हळहळला आहे.