दोन कामगार ठार, दोघे बेपत्ता
| उरण | वार्ताहर |
जेएनपीटीच्या शॉलो वाटर बर्थजवळ असलेल्या ड्रेझिंग बार्जमध्ये पेंटिंगचे काम सुरू असताना अचानक ठेवण्यात आलेल्या अत्यंत ज्वलनशील थीनरला आग लागून भीषण स्फोट झाल्याची घटना सोमवारी (दि. 11) संध्याकाळी 6.30 च्या सुमारास घडली. या स्फोटात दोन कामगार मरण पावले आहेत. तर, दोन कामगार बेपत्ता झाल्याचे सदर कामगारांकडून सांगण्यात येत आहे. जेएनपीएच्या शॉलो वाटर बर्थजवळ मागील पाच-सहा महिन्यांपासून रो-रो सर्व्हिस जेट्टीचे काम सुरू आहे. यासाठी समुद्रात खोली वाढविण्यासाठी ड्रेझिंगचे काम सुरू आहे. हे काम परेश इंन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. या खासगी कंपनीकडून केले जात आहे.
या कंपनीकडून ड्रेझिंग बार्जच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. सोमवारी (दि.11) या बार्जमध्ये पेंटिंग्जचे काम करण्यासाठी सहा कामगार उतरले होते. पेंटिंग्जचे काम सुरू असतानाच 6.30 वाजताच्या सुमारास रंगात मिसळण्यासाठी ठेवण्यात आलेल्या अत्यंत ज्वलनशील थीनरला आग लागण्याची दुदैवी घटना घडली.पेंटिंग्जच्या कामामुळे याआधीच बार्जमध्ये मोठ्या गॅस निर्माण झाला होता.ज्वलनशील तरल थीनरचे डबे आणि गॅसने पेट घेतला. याआगीमुळे भीषण स्फोट झाला आहे.
या स्फोटात अब्दुल सलाम (21) हा कामगार जागीच ठार झाला. तर हिरालाल प्रजापती (25) हा कामगार 90 टक्के भाजल्याने त्याला जेएनपीटी ट्रॉमा सेंटरमधून ऐरोली येथील बर्न इस्पितळात उपचारासाठी पाठविण्यात आले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. गंभीररित्या जखमी झालेल्या अनुज राजवीर सिंह (23) या कामगारांवर जेएनपीटी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती डॉ. बी.एस. देसाई यांनी दिली. अन्य दोन कामगार मनिष (22) व बालक (22) बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु आहे, असे कामगारांकडून सांगण्यात येत आहे. या बार्जमध्ये एकूण सहा कामगार काम करीत होते, अशी माहिती जखमी कामगार अनुज राजवीर सिंह यांनी दिली आहे. याप्रकरणी न्हावा-शेवा बंदर पोलीस ठाण्याकडे विचारणा केली असता, त्यांच्याकडून तपास सुरू आहे, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सदर ठेकेदाराला वाचविण्यासाठी न्हावा शेवा पोलीस ठाण्याचा तपास संशयास्पद वाटत आहे.