कर्जतमध्ये आता कसोटी; राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे शक्तिप्रदर्शन

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत विधानसभा मतदारसंघात आमचा गट सरस आहे हे दाखविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मधील शरद पवार गट आणि अजित पवार गट यांनी कर्जत खोपोली मध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केले. राष्ट्रवादी कडून अजित पवार गटाचे सुधाकर घारे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करून माजी आमदार सुरेश लाड यांच्या पेक्षा वरचढ असल्याचा मेसेज देण्याचा यशस्वी झाला. मात्र या शक्ती प्रदर्शनानंतर अजित पवार गटाने वर्चस्व मिळविण्यासाठी पुढील पाऊल टाकले आहे, त्यामुळे सुरेश लाड यांची राजकीय कारकीर्द पणाला लागली आहे. कर्जत तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते खासदार सुनील तटकरे यांच्याशी संबंधित होते आणि त्यामुळे बहुतांश कार्यकर्ते अजित पवार गटाकडून वळल्याने शरद पवार गटाचे जिल्ह्यात आणि कर्जत विधानसभा मतदारसंघात कोणी साथ देणार नाही असे बोलले जात होते. मात्र लाड यांनी जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली आणि कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा मेळावा झाला. पक्षातील जुने कार्यकर्ते यांचा भरणा त्या मेळाव्यात अधिक प्रमाणात दिसून आला आणि महत्वाचे म्हणजे स्थानिक पातळीवर जमत नसल्याने कार्यकर्ते दोन गटात विभागले गेल्याचे दिसून आले. मात्र सुरेश लाड यांच्या पाठीशी कार्यकर्ते आहेत हे त्यानिमित्ताने स्पष्ट झाले होते. मात्र विधानसभा निवडणूक जिंकून आमदार होण्याचे स्वप्न उराशी बाळगून पक्ष नेतृत्वाचे आदेशाने पक्ष बांधणीचे काम करणारे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी कर्जत येथे प्रचंड गर्दीचा मेळावा भरवून आपली दावेदारी स्पष्ट केली.

यानिमित्ताने आमदार महेंद्र थोरवे यांच्यासमोर सुरेश लाड आणि सुधाकर घारे यांनी आपली दावेदारी एकप्रकारे जाहीर केली आहे. तर शिवसेना ठाकरे गटाकडून उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे. शिवसेना दोन्ही गटातील उमेदवारी यांची नावे निश्चित असून त्यांचे नियोजन सुरू आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस मधील दोन्ही गटांनी सुरू केलेली चढाओढ ही कार्यकर्त्यांसाठी निश्चित मारक ठरणार आहे. त्यात दोन्ही गटाकडून झालेल्या तीन कार्यकर्ता बैठकीत केलेली चुरस ही आगामी विधानसभा निवडणुकीचे निमित्ताने सर्वांची उत्सुकता आता वाढली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस मधील दोन्ही गटाचे राजकारण कार्यकर्त्यातील वातावरण वेगळ्या दिशेने चालले आहेत काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण गेल्या वर्षभरात एकमेकांचे गळ्यात गळे घालून एकाच वाहनातून फिरणारे कार्यकर्ते हे दोन गटांमध्ये विभागले गेल्याने दोन वेगवेगळ्या दिशेने वागू लागले आहेत. त्यातून एकसंघ असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. कारण पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची शिवसेना शिंदे गतासोबत वाद सुरू असायचे. आता शिंदे आणि ठाकरे गट यांच्यातील वाद बाजूला पडले असून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वाढली आहे. हे सर्व आपले राजकीय वर्चस्व वाढण्यासाठी कर्जत विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात वादाला ठिणगी पडण्याची शक्यता वाढली आहे.

Exit mobile version