। मुंबई । प्रतिनिधी ।
बेस्ट उपक्रमाने सरासरी तिकिटात आणि पासमध्ये सरसकट दुपटीने वाढ करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे साध्या बेस्ट बसचे कमीत कमी प्रवासभाडे हे 10 रुपये होणार आहे. तर, एसी बसचे तिकीट 6 रुपयांवरून 12 रुपये होणार आहे. याचा फटका बेस्टने प्रवास करणार्या 31 लाख 50 हजार प्रवाशांना बसणार आहे. आधीच महागाईने होरपळलेल्या मुंबईकरांना आता बेस्ट भाडेवाढीची झळही बसणार आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी बेस्टच्या दरवाढीला विरोध केला आहे. लाखो मुंबईकरांना सेवा देणार्या बेस्टचे हे अधःपतन आम्ही सहन करु शकत नाही, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
बेस्ट दरवाढीला विरोधात आदीत्य ठाकरे यांनी म्हटले की, मुंबईतील सामान्य माणसाची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बससेवेकडे सत्ताधार्यांकडून गेल्या 2-3 वर्षांत मुद्दाम दुर्लक्ष केले जात आहे. आता तर बेस्टची दुप्पट दरवाढ करण्याची बातमी आली आहे. सामान्य मुंबईकरांचे रोजचे जगणेच कठीण व्हावे असाच सत्ताधार्यांचा विचार दिसत आहे. जगातील सर्वात स्वस्त शहरी बससेवा अशी ओळख असलेल्या आणि लाखो मुंबईकरांना सेवा देणार्या बेस्टचे हे अधःपतन आम्ही सहन करु शकत नाही. बेस्ट दुप्पट दरवाढीला आमचा विरोध आहे. बेस्ट बसेसची संख्या आधीच रोडावल आहे, महत्वाचे मार्ग बंद केलेत, आता जर दरवाढही केली तर बेस्टवर त्याचा विपरीत परिणाम होईल. आमची ठाम मागणी आहे, इलेक्ट्रिक बसेसची संख्या वाढवा, बेस्टचा दर्जा सुधारा आणि मुंबईकरांना चांगली सेवा द्या. बेस्ट वाचवा. असे ते म्हणाले.






