शिवसेना, राष्ट्रवादी याचिकेवर एकत्रित सुनावणी
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे दिरंगाई करत असल्याचा आरोप ठाकरे गटाचा आहे. त्यानंतर पवार गटाकडूनही तोच आरोप करण्यात आला आहे. ‘विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आमदारांवर कारवाई करण्यासाठी पत्र देण्यात आले आहे. मात्र, त्यांनी आणखी कुठलीही कारवाई केली नाही. अध्यक्ष वेळखाऊ पणा करत आहेत म्हणून त्यांना कारवाईचे निर्देश द्या’, असं म्हणत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे. दरम्यान, अजित पवार गटाविरोधात दाखल केलेल्या आमदार अपात्रतेच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार होती. मात्र, पवार गटाच्या याचिकेवर स्वतंत्रपणे सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला.
एकीकडे निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? याची लढाई सुरू असतानाच आता दुसरीकडे निवडणूक आयोगासमोर शरद पवार गटाकडून आमदार अपात्रतेसंबधी याचिका दाखल करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेची कारवाई करावी, यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे. आमदार अपात्रतेसंबधीची पुढील सुनावणी शुक्रवारी (दि.13) पार पडणार आहे. दरम्यान, शिवसेना 16 आमदार आणि राष्ट्रवादी प्रकरणी एकत्र सुनावणी शुक्रवारी पार पडेल, अशी माहिती समोर आली आहे. शिवसेना अपात्रतेची सुनावणी आधी पुढच्या महिन्यात पार पडणार होती. मात्र, आता ती शुक्रवारी पार पडणार आहे.
सुप्रीम कोर्ट महत्त्वाचे निर्देश शुक्रवारी देऊ शकत का, या सुनावणीकडे संपुर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे.