विधानसभा पोटनिवडणुकीत ठाकरेंची मशाल पेटली

| मुंबई | प्रतिनिधी |

राज्यातील सत्तांतरानंतर झालेल्या पहिल्याच विधानसभा पोटनिवडणुकीत ठाकरे गटाची मशाल पेटली आहे. अंधेरी पूर्व मतदार संघातून या गटाच्या ऋतुजा लटके या निवडूण आलेल्या आहेत. त्यांना 58, 875 एवढी मते मिळाली आहे. तर नोटाला 11569 इतकी मत मिळाली आहेत. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ही निवडणूक अटीतटीची ठरली आहे. अवघ्या राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागून राहिलं होतं. ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी या पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांना 90 ते 95 टक्के मतं मिळतील, असा अंदाजही व्यक्त केला होता. दरम्यान, ऋतुजा लटके पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यातही जास्त मतांनी विजयी ठरल्या.

राज्यातील सत्तांतरानंतर मुंबईत होणार्‍या या पहिल्याच निवडणुकीत ठाकरे गटाला आपले वर्चस्व दाखवून देण्यासाठी ऋतुजा लटके याचा विजय आवश्यक होता. रविवारी सकाळी 8 वाजता टपाली मतमोजणीस सुरवात झाली होती. भाजपच्या मुरजी पटेल यांनी माघार घेतल्यामुळे ही निवडणूक एकतर्फी झाली. त्यामुळे मतमोजणी सुरु झाल्यानंतर पहिल्या तीन ते चार तासांमध्येच निकाल स्पष्ट होईल, असा राजकीय जाणकारांनी अंदाज व्यक्त केला होता.

मतदारांच्या निरुउत्साहामुळे निवडणुकीत अवघे 31.74 टक्के इतके मतदान झाले होते. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी पूर्व मतदारसंघात एकूण 2,71,000 मतदार आहेत. मात्र, यापैकी फक्त 31.74 टक्के म्हणजे 85,698 नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यामुळे निकालाच्या दिवशी कसं चित्र असेल, याविषयीचा संभ्रम वाढला होता.

मतदानाच्या काही दिवस आधी भाजपकडून पडद्यामागून नोटा चा प्रचार केला जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. ऋतुजा लटके यांच्यापेक्षा नोटा या पर्यायाला जास्त मतं पडावीत, यासाठी पद्धतशीर आखणी केली जात असल्याचे ठाकरे गटाचे म्हणणे होते. परंतु ऋतुजा लटके यांच्यानंतर ची दुसरी जास्त मते नोटाला मिळण्याच यावेळी दिसून आलं आहे.

विजयानंतर ऋतुजा लटके उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर पोहोचल्या होत्या. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि शिंदे गटाला लक्ष्य केलं.

कपट कारस्थानानंतर पहिली पोटनिवडणूक झाली. आमचं चिन्ह आणि नाव गोठवलं गेलं. मशाल चिन्ह घेऊन आम्ही निवडणूक लढलो. ही मशाल भडकली असून भगवा फडकला आहे याचा मला अभिमान आणि आनंद आहे. या विजयाचं श्रेय शिवसैनिकांसह आमच्यासोबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित, कम्युनिस्ट पक्ष, संभाजी ब्रिगेड आणि हितचिंतकांचं आहे. त्या सर्वांचे मी आभार मानता.

उद्धव ठाकरे
पक्षप्रमुख

आपला दारूण पराभव होत असल्याची चाहूल लागल्यानेच भाजपाला निवडणुकीतून पळ काढावा लागला. महाविकास आघाडीवर विश्‍वास व्यक्त करत अंधेरीच्या जनतेने भाजपा व शिंदे गटाच्या तोडफोडीच्या राजकारणाला मोठी चपराक लगावली आहे.

नाना पटोले
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
Exit mobile version