तळीये दरडीतील 15 मृतदेह शोधण्यात ठाणे आपत्ती दलाला यश

मृतदेह शोधणार्‍या टीमला माणगावकरांचा सलाम
। माणगाव । सलीम शेख ।
अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यात सावित्री, काळ, गांधारी या नद्यांचे पाणी घुसल्याने नागरिकांचे अतोनात नूकसान झाले. याच दिवशी सायंकाळी तालुक्यातील 35 घरांचे कुटुंब राहत असलेल्या तळीये गावावर दरड कोसळून क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. या घटनेची माहिती समजताच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के हे ताबडतोब ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे आपत्ती प्रतिसाद दल (टीडीआरएफ) टीमसमवेत त्याचदिवशी महाडकडे रवाना झाले. तळीये दरडग्रस्त गावात सर्वप्रथम हि टीम पोहचून त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या दलाला 15 मृतदेह शोधण्यात यश आले.

टिमच्या कार्याबद्दल महापौर नरेश म्हस्के यांचे मंगळवारी (दि.27) सकाळी हॉटेल आनंद भुवन, माणगाव येथे माजी नगराध्यक्ष आनंदशेठ यादव, माजी उपनगराध्यक्ष संदीप खरंगटे, सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर अलीभाई यतिनमनी, युवानेते तन्मय यादव यांनी स्वागत करून टीमच्या कार्याचे मनापासून कौतुक केले.

महाड तालुक्यातील तळीये गावावर दि.22 जुलै रोजी सायंकाळी दरड कोसळून हे गाव पूर्णपणे जमीनदोस्त झाले. या घटनेची माहिती समजताच ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे आपत्ती दलाच्या 16 सदस्यीय टीमने जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के यांच्यासमवेत ताबडतोब घटना घडलेल्या महाडकडे प्रयाण करून तळीये दरडग्रस्त गावातील घटनास्थळाची पाहणी केली. नंतर या टीमने सलग चार दिवस रेस्क्यू ऑपेरेशन करीत दरडीखाली मिळालेल्या 52 मृतदेहांपैकी 15 मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळविले.

सकाळी 7 ते रात्री 8:30 पर्यंत ही टीम दररोज अथक परिश्रम घेऊन कमरेपेक्षा जास्त चिखलातून मार्ग काढीत रेस्क्यू ऑपेरेशन करीत होती. या टीममध्ये टीमचे प्रमुख आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संतोष नामदेव कदम, सिनिअर जवान सचिन शरद डुबे, सिनिअर जवान चेतन एकनाथ तरोळे, किशोर अरविंद भोसले, गणपत मोतीराम मुकणे, शांताराम अशोक कोकणे, संदेश सुभाष घोडे, किरण बाळू घोडे, पराग दिलीप चिंबाटे, ज्ञानेश्‍वर द्वारकादास पवार, राजेंद्र प्रल्हाद नागरे, सुमित किशोर परदेशी, अक्षय प्रकाश पाटील, प्रशांत यादव बोंबे, लक्ष्मण पांडुरंग गांगर्डे, रमेश नारायण वसाने आदी सहभागी झाले होते.

Exit mobile version