धन्यवाद, मिताली

तब्बल बावीस वर्षे आणि 274 दिवस भारतासाठी क्रिकेट खेळल्यानंतर मिताली राज आता निवृत्त झाली आहे. वयाच्या सोळाव्या वर्षी तिने भारतातर्फे खेळायला सुरुवात केली आणि 2022 पर्यंत तिच्या नावावर अनेक विक्रम जमा झाले. तिची तुलना अनेकदा सचिन तेंडुलकरशी केली जाते. दोघांचीही करियर लहान वयात सुरू झाली व दीर्घ काळ चालली. भारतात क्रिकेटला धर्म मानले जाते. पण या धर्मामध्येही स्त्री-पुरुष भेद आहे. पुरुषांच्या क्रिकेटला इथे कमालीचे महत्व आहे. महिलांच्या क्रिकेटला मात्र तितकीशी लोकप्रियता नाही. मितालीच्या आकडेवारीवर नुसती नजर टाकली तरी ते ठळकपणे जाणवतं. सुमारे तेवीस वर्षांमध्ये तिने, म्हणजेच भारतीय संघाने खेळलेले कसोटी क्रिकेट सामने आहेत केवळ बारा. म्हणजे साधारण दोन वर्षातून एक कसोटी असे हे प्रमाण पडते. पण त्यात मितालीने जी चमक दाखवली आहे ती पाहता पुरुषांच्या बरोबरीने तिला कसोटी सामने खेळायला मिळाल्या असत्या तर तिने कितीतरी अधिक धावा केल्या असत्या हे स्पष्ट दिसते. स्त्री-पुरुष भेदभावाचा आणखी एक नमुना म्हणजे मितालीच्या अनेक विक्रमांविषयी काही रसिकांना ठाऊक असेल. पण तिची फलंदाजीची शैली कशी होती व आवडते फटके कोणते होते हे पटकून कोणीही सांगू शकणार नाही. असो. कसोटीमध्ये भारतातर्फे द्विशतक करणारी ती एकमेव महिला खेळाडू आहे. एकदिवसीय सामने हाही तिचा खास प्रांत राहिला. त्यातही तिने सात शतके आणि तब्बल 64 अर्धशतके झळकवली आहेत. एक दिवसीय सामन्यांमध्ये भारताची सर्वाधिक धावा करणारी फलंदाज असा विक्रम तिच्या नावावर आहे. टीट्वेन्टीमध्येही तिच्या सर्वाधिक धावा नाबाद 97 इतक्या आहेत. शिवाय तिथेही तिने सतरा अर्धशतके झळकावलेली आहेत. किंबहुना, एक दिवसीय सामन्यात सात हजारांहून अधिक धावा करणारी आणि सलग सात अर्धशतकं झळकावणारी ती एकमेव महिला फलंदाज आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारी खेळाडू असाही एक पराक्रम तिच्या नावे आहे. मिताली ही निव्वळ स्वतःसाठी खेळणारी फलंदाज नव्हती. तर ती संघाला बरोबर घेऊन जात असे. त्यामुळेच सर्वाधिक म्हणजे तब्बल 155 सामन्यांमध्ये तिने भारताचे कर्णधारपद भूषवले. त्यातल्या किमान साठ टक्के सामन्यांमध्ये तिने विजय मिळवून दिला. आधी सौरभ गांगुली आणि नंतर महेंद्रसिंग धोनी यांनी पुरुष भारतीय संघाला जिंकायची सवय लावली असे म्हटले जाते. मितालीची आकडेवारी त्यांच्याशी बरोबरी करणारी आहे. दोन विश्‍वचषकांमध्ये तिच्या नेतृत्वाखाली भारताचा संघ खेळला आणि त्यात बारा वर्षांचं अंतर होतं. 2017 मध्ये आपला संघ इंग्लंडकडून नऊ धावांनी पराभूत झाला, पण त्याने रसिकांची मने जिंकली. त्याच वर्षी मितालीला आयसीसी प्लेअर ऑफ द इअर हा बहुमान मिळाला होता. तमीळ घरात जन्मलेली आणि हैदराबादेत बालपण गेलेली मिताली ही अनिल कुंबळे, आर. अश्‍विन, विश्‍वनाथन आनंद अशा विचारी आणि बुध्दिमान खेळाडूंशी नातं सांगणारी आहे. एकदा भारताचा संघ मैदानात खेळत असताना, बॅटपॅड लावून तयारीत बसलेली मिताली सामना न पाहता पुस्तक वाचत बसल्याचा फोटो प्रसिध्द झाल्याने मोठा वाद झाला होता. अनेकांनी तिचा संघासोबत तिचा काही संवाद नाही किंवा तिला खेळण्यात फार रस उरलेला नाही अशी शेरेबाजी केली होती. पण वाचनामुळे मन शांत राहतं असं सांगून या टीकाकाराना तिने उत्तर दिले होते. शिवाय, त्या दिवशी मैदानावरच्या खेळाने तिने दिलेले प्रत्युत्तर वेगळेच. इतक्या दीर्घ काळात काही वादविवाद होणे अपरिहार्य असते. त्यानुसार नव्या पिढीची कर्णधार हरमनप्रीत व किंवा मध्यंतरी काही काळ कोच असलेले रमेश पोवार यांच्याशी तिचे मतभेद झाले होते. पण त्यांचा तिने खेळावर वा संघाच्या कामगिरीवर परिणाम होऊ दिला नाही. मिताली किंवा झुलन गोस्वामी आणि त्यांच्या आधीच्या पिढीतील डायना एडलजी यांसारख्या खेळाडूंमुळे महिला खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी मोठी प्रेरणा मिळाली. आता मितालीच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग बीसीसीआयने करून घ्यायला हवा. 

Exit mobile version