दादर-दिवा पॅसेंजरच्या जागी नवी ट्रेन धावणार
| रायगड | प्रतिनिधी |
कोकणवासियांकडून कोरोना काळात बंद पडलेली दादर-दिवा पॅसेंजर सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी मागणी जोर धरत होती. प्रवाशांची गरज आणि वाढती मागणी पाहता मध्य रेल्वे प्रशासनाने कोकणवासीयांसाठी दिलासा देणारी बातमी जाहीर केली आहे. मध्य रेल्वेने दादर-दिवा पॅसेंजर पुन्हा कायमस्वरूपी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल 25 वर्षांनंतर दिवा रेल्वे स्थानक ते चिपळूण रेल्वे स्थानकापर्यंत मेमू लोकल रेल्वे सेवा प्रवाशांसाठी सुरु करण्यात आली आहे. मात्र, या लोकलच्या वेळापत्रकात काही बदल करण्यात आले असून कोकणवासियांचा प्रवास आता कमी खर्चात आणि सोयीस्कर होणार आहे.
कसे असेल वेळापत्रक?
दिवा ते चिपळूण आणि चिपळूण ते दिवा अशा दोन मेमू लोकल उपलब्ध असणार आहे. यामध्ये दिवा-चिपळूण ही गाडी सकाळी 7.15 वाजता सुटेल आणि 6 ते 7 तासात चिपळूणला पोहोचेल.तर चिपळूण ते दिवा ही गाडी दुपारी 12 वाजता चिपळूणमधून निघणार असून 6 ते 7 तासात दिवा येथे पोहोचेल. या सेवेमुळे सध्याच्या एक्स्प्रेस गाड्यांवरील प्रवाशांचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल.
26 स्थानकांवर थांबा
दिवा रेल्वे स्थानक ते चिपळूण रेल्वे स्थानकापर्यंत मेमू लोकल रेल्वे सेवा 26 स्थानकांवर थांबणार आहे. यामध्ये चिपळूण, खेड, वीर, माणगाव, इंदापूर, गोरेगाव, कोलाड, रोहा, पेण, पनवेल या महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश आहे. आतापर्यंत अनेक एक्स्प्रेस गाड्यांना संगमेश्वर आणि खेड येथे थांबे दिले जात नव्हते. परिणामी येथील प्रवाशांना रेल्वेने प्रवास करण्यासाठी चिपळूणपर्यंत यावे लागत होते. मात्र आता मेमू लोकल रेल्वे सेवेमुळे दापोली, मंडणगड आणि गुहागर तालुक्यातून येणाऱ्या प्रवाशांना चांगलाच फायदा होणार आहे. दरम्यान, मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे 25 वर्षांनंतर चिपळूणसाठी स्वतंत्र गाडी मिळाली असून प्रवाशांची मोठी समस्या सुटली आहे. तसेच कमी दरात जलद प्रवासाची सुविधा मिळाल्याने कोकणातील प्रवाशांना मोठा फायदा होणार असून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळण्याची शक्यता आहे.







