| नेरळ | प्रतिनिधी ।
बदलापूर येथील अल्पवयीन बालकांच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल आहे. बदलापूर येथील आदर्श विद्या मंदिर संस्थेचे पदाधिकारी हे गेली महिनाभर फरार असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांच्या अनेक टीम कार्यरत होत्या. बुधवारी (दि. 02) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आदर्श संस्थेचे विश्वस्त तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांना कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्याने प्रवास करताना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट चारने पकडले आहे.
11 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट या कालावधीत बदलापूर येथील आदर्श विद्या मंदिर शाळेच्या बालवाडी विभागातील दोन मुलींवर शाळेतील कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केले होते. त्या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक, संस्थेचे विश्वस्त यांच्यावर पोसको अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र मागील महिन्यापासून आदर्श शिक्षण संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष तुषार आपटे आणि सचिव उदय कोतवाल हे सह आरोपी पोलिसांच्या हाती लागत नव्हते. त्या दोन्ही सह आरोपीबद्दल मुंबई उच्च न्यायालयानेदेखील आरोपींना अटक का केली जात नाही? असा सवाल उपस्थित केला होता. पोलिसांच्या कारभारावर उच्च न्यायालयाने शिंतोडे उडविले होते.
बुधवारी (दि.02) कर्जत-कल्याण रस्त्याने प्रवास करीत असल्याची माहिती ठाणे येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट चारला मिळाली होती. त्यामुळे सायंकाळी सहा वाजल्यापासून ठाणे येथील गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस कर्जत भागात तैनात होते. रात्री साडे आठच्या सुमारास तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांच्यातील फोन कॉलनंतर पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले. त्यांनी कर्जत-कल्याण रस्त्यावरील वांजळे गावाच्या हद्दीत वाहनांमधून प्रवास करीत असलेल्या तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांच्या गाडीचा पाठलाग करून गाडीचा ताबा घेतला. त्यानंतर नऊ वाजता त्याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे जाऊन आपटे आणि कोतवाल यांना वांजळे येथे पकडले असल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली. ठाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे टीमकडून कर्जत वांजळे येथे दोघांना पडकल्यानंतर एक टीम या दोघांना घेऊन ठाणेकडे रवाना झाली.