आठ कोटींची वीज प्रतिरोधक यंत्रणा वार्यावर; प्रस्ताव राज्य, केंद्र सरकारकडे धूळखात
| रायगड | आविष्कार देसाई |
पावसाळ्यामध्ये वीज अंगावर पडून मृत्यू होण्याचे प्रकार सरार्स घडतात. जीवितहानीबरोबरच वित्तहानीदेखील होते. विशेषतः समुद्रकिनारी असणार्या ठिकाणी हा धोका अधिक असतो. यावर उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील 980 ठिकाणी वीज प्रतिरोधक यंत्रणा बसवण्यात येणार होती. राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत तब्बल आठ कोटी 30 लाख रुपये खर्चाची ही योजना होती. जिल्हा प्रशासनाने याबाबतचा प्रस्ताव सुमारे चार वर्षांपूर्वी राज्य सरकारकडे पाठवला होता. जिल्ह्यात वीज कडाडून ती पडतदेखील आहे. परंतु, प्रस्ताव मंजूर करायला राज्य सरकारच्या डोक्यात लख्ख प्रकाश अद्याप पडलेला नाही.
जिल्ह्यात सरासरी साडेतीन हजार मिमी पावसाची नोंद होते. मान्सूनपूर्व पडणार्या पावसाच्या वेळी जिल्ह्यातील विविध भागांमध्ये वीज पडण्याच्या घटना सातत्याने घडताना दिसून येतात. त्यामध्ये दरवर्षी सरासरी दोन नागरिकांचा बळी जात आहे, तर गुरे-ढोरे मृत होण्याचे प्रमाणही लक्ष वेधणारे असेच आहे. वीज पडून होणार्या आपत्तीमध्ये सार्वजनिक तसेच खासगी मालमत्तेचेही लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे. जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे 26 लाखांच्या आसपास आहे. जिल्ह्यात असणार्या विविध प्रकल्पांमुळे नागरीकरणामध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. दाटीवाटीच्या शहर-गावांमध्ये वीज पडल्यास मोठ्या प्रमाणात हानी होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यातील 13 विभागांतील 980 ठिकाणी वीज प्रतिरोधक यंत्रणा बसवण्याचे नियोजन केले होते. याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडून केंद्र सरकाराल पाठवण्यात आला असल्याचे तत्कालीन संचालक (राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग) अभय यावलकर यांनी तेव्हा स्पष्ट केले होते. मात्र, अद्यापही सरकारी पातळीवरुन कोणताच सकारात्मक प्रतिसाद आला नसल्याचे जिल्हा आपत्ती विभागाने स्पष्ट केले.
सर्वसाधारणपणे उंच इमारती, मोबाईल टॉवर, कंपन्यांच्या चिमण्या, वेधशाळा, उच्च दाबाच्या वीज वाहिनी टॉवर या ठिकाणी वीज प्रतिरोधक यंत्रणा बसवण्यात आलेली आहे. या ठिकाणच्या परिसरामध्ये वीज कोसळली तर वीज प्रतिरोधक यंत्रणा आपल्याकडे वीज खेचून घेते. त्यानंतर सक्षम प्रणालीच्या माध्यमातून ती जमिनीखाली वळवली जाते. त्यामुळे वीज पडण्याच्या घटना कमी होऊन मनुष्य आणि वित्तहानी टाळता येते. याच कारणासाठी जिल्ह्यात वीज प्रतिरोधक यंत्रणा बसवण्यात येणार होती.
रेवस, मांडव्याचे दीपस्तंभ दिशादर्शक
ब्रिटिशांच्या कालावधीत अलिबाग तालुक्यातील रेवस आणि मांडवा या ठिकाणी सुमारे 100 फूट उंचीचे दीपस्तंभ उभारण्यात आले होते. पूर्वी समुद्रमार्गे धरमतरची खाडी ते अगदी श्रीवर्धन ते गोवा, कर्नाटकपर्यंत व्यापार चालायचा. त्यांना हे दीपस्तंश दिशादर्शक ठरायचे. त्याचप्रमाणे मुघल कालखंडात रात्रीच्या वेळी भर समुद्रातून एखादे जहाज कोकण प्रांतात येत असेल, तर टेहळणी बुरूज म्हणूनदेखील या दीपस्तंभाचा उपयोग केला जात होता. या दोन्ही दीपस्तंभांवर वीजरोधक प्रणाली बसवण्यात आली होती. त्यामुळे अलिबाग तालुक्यामध्ये वीज पडत नव्हती. सध्या तांब्याच्या साहित्याची सुमारे 50 वर्षांपूर्वी चोरी झाली आहे. सरकारने या दीपस्तंभाची डागडुजी करुन वीज प्रतिरोधक यंत्रणा नव्याने कार्यान्वित करण्याच्या मागणीच्या पुनरुच्चार करण्यात येत आहे.
कोठे प्रस्तावित आहे यंत्रणा?
जिल्हाधिकारी कार्यालय-1, जिल्हा परिषद मुख्यालय- 1, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय -1, जिल्हा सामान्य रुग्णालय-1, उपविभागीय अधिकारी कार्यालय (सर्व)-8, तहसीलदार कार्यालय (सर्व)-15, गटविकास अधिकारी कार्यालये (सर्व)-15, नगरपालिका/नगरपंचायत कार्यालये (सर्व)-15, उपजिल्हा रुग्णालये/ग्रामीण रुग्णालये (सर्व)-16, प्राथमिक आरोग्य केंद्र (सर्व)-52, पोलीस ठाणे (सर्व)-36, बसस्थानके-15, ग्रामपंचायत कार्यालये (सर्व)-804, अशी एकूण वीज प्रतिरोधक संख्या-980.