भारतात दीड वर्षांपासून बेकायदा वास्तव्य
| पनवेल | वार्ताहर |
नवीन पनवेल सेक्टर- 18 भागात नोव्हेंबरमध्ये घडलेल्या हत्या प्रकरणातील आरोपी पप्पू उर्फ शफीक उल अहमद हा बांगलादेशमधून दीड वर्षांपूर्वी घुसखोरी करून भारतात आल्याचे तसेच तो गुजरात आणि पनवेल भागात बेकायदा राहात असल्याचे तपासात आढळून आले आहे. त्याने गुजरातमध्ये असताना, भारतातील नागरिकांचे ओळखपत्र असलेले आधारकार्डसुद्धा तयार करून घेतल्याचे तपासात आढळून आले आहे. त्यामुळे खांदेश्वर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला. आरोपी सध्या हत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहे.
आरोपी पप्पू उर्फ शफीक (25) याचे नोव्हेंबरमध्ये नवीन पनवेलमधील पोदी नं. 2 भागात राहणार्या एका विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध जुळले होते. मात्र, तिचा पती या संबंधांमध्ये अडथळा ठरत होता. त्यामुळे आरोपी पप्पू याने पश्चिम बंगालमधून दोन साथीदारांना बोलावून तिच्या पतीची गळा चिरून हत्या केली होती. त्यानंतर खांदेश्वर पोलिस आणि गुन्हे शाखेने या हत्या प्रकरणाचा छडा लावून तिन्ही आरोपींना अटक केली होती. तेव्हापासून हे आरोपी न्यायालयीन कोठडीत असून, खांदेश्वर पोलिसांनी हत्येचा तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.
दरम्यान, पोलिसांच्या तपासात उघड आरोपी पप्पू उर्फ शफीक हा मे 2021 मध्ये बांगलादेशातून घुसखोरी करून नव भारतात आल्यानंतर सुरुवातीला गुजरातमधील सुरत येथे व त्यानंतर पनवेलमध्ये बेकायदा वास्तव्यास असल्याचे आढळून आले आहे. या कालावधीत तो बांधकामस्थळी काम करून तिथेच राहत असल्याचे तसेच त्याने गुजरातमध्ये आधारकार्ड बनवून घेतल्याचे तपासात आढळून आले. नोव्हेंबरमध्ये त्याने हत्या केल्यानंतर तो बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आले. त्यानुसार खांदेश्वर पोलिसांनी त्याच्याविरोधात पारपत्र अधिनियम परकीय नागरिक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.