टोरंटविरोधात वातावरण आखणी तापणार; संयुक्त मोजणीच्या 226 शेतकऱ्यांना नोटिसा
| नेरळ | प्रतिनिधी |
सायडोंगर येथील जंगलतोडीवरून टोरंट पॉवरचा हायड्रोपंप्ड प्रकल्प वादात असतानाच आता पोहोच रस्त्यासाठी जमिनींच्या मोजणीचा घाट घालण्यात आला आहे. शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आणि जनसुनावणी रद्द झाल्यानंतरही प्रशासनाने 25 नोव्हेंबरला संयुक्त मोजणी निश्चित केली आहे. भालिवडी, पोटल, आंबोट, पाली आणि सायडोंगर या पाच गावांतील तब्बल 226 शेतकऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे टोरंटविरोधातील संघर्ष पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत.
टोरंटच्या सायडोंगर प्रकल्पासाठी कर्जत-वैजनाथ प्रमुख जिल्हा मार्गावरून सुमारे सहा किलोमीटरचा पोहोच रस्ता प्रस्तावित आहे. या रस्त्यासाठी एप्रिल 2026 मध्ये भूसंपादनाची अधिसूचना काढण्यात आली होती. 7 ऑक्टोबर रोजी कर्जत तहसील कार्यालयात झालेल्या जनसुनावणीत शेतकऱ्यांनी प्रश्नांची उत्तरे मिळत नसल्याचा आक्षेप घेत सुनावणी रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानंतर जिल्हा भूसंपादन अधिकारी श्रीकांत गायकवाड यांनी सुनावणी गुंडाळली होती.
यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी मोजणी करू दिली नव्हती. आता भूमीअभिलेख विभागामार्फत पाच गावांतील 13 सर्व्हे क्रमांकांची संयुक्त मोजणी केली जाणार आहे. यासाठी भूमापक सचिन थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी प्रकल्पालाच विरोध केला असताना मोजणी पुढे रेटली जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. 25 नोव्हेंबरला प्रशासन आणि शेतकरी आमनेसामने येण्याची शक्यता आहे.
मोजणीचे चलन किती? माहिती गुलदस्त्यात!
संयुक्त मोजणी ‘अतितातडीची’ म्हणून केली जाणार आहे. मात्र, यासाठी सरकारी चलनापोटी किती रक्कम भरली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. 13 सर्व्हे क्रमांकांच्या मोजणीसाठी मोठे शुल्क आकारले गेले असण्याची शक्यता असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याबाबत माहिती दिली जात नाही.
कर्जत येथे झालेल्या जनसुनावणीत स्थानिकांच्या प्रश्नांची उत्तरे मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी सुनावणी रद्द करण्याची मागणी केली. त्यानंतर जिल्हा भूसंपादन अधिकारी सुनावणीच्या ठिकाणाहून निघून गेले. मात्र, पुढील सुनावणी न घेता आता थेट मोजणी केली जात आहे. मग हे सरकार नेमके जनतेचे आहे की श्रीमंतांचे, असा प्रश्न आम्हाला पडला आहे.
– ॲड. कैलास मोरे
