4205 अधिकरी व कर्मचाऱ्यांकरिता प्रशिक्षण
| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महापालिकेची निवडणूक पारदर्शक, निष्पक्ष व सुरळीतपणे पार पडावी, यासाठी निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी महापालिका प्रशासन कामाला लागले आहे.
महापालिकेतील 20 प्रभागनिहाय क्षेत्राकरिता 660 मतदान केंद्र आहे. सहा निवडणूक निर्णय अधिकारी, 68 क्षेत्रीय अधिकारी तसेच मतदान केंद्राध्यक्ष, सहायक मतदान अधिकारी, शिपाई आणि 65 राखीव मतदान केंद्रांकरिता सुसज्ज अशी एकूण 725 पथके तैनात केली आहेत. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात प्रशिक्षण सत्रांचे आयोजन केले आहे. प्रशिक्षणामध्ये निवडणूक प्रक्रियेतील जबाबदाऱ्या, आचारसंहिता, मतदान व मतमोजणी प्रक्रिया, कायदेशीर बाबी, ई.व्ही.एम. मशीन प्रत्यक्ष हाताळणी तसेच आपत्कालीन परिस्थितीत करावयाची कार्यवाही याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
निवडणूक प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे कोणतीही त्रुटी, गोंधळ किंवा गैरप्रकार टाळून निवडणूक प्रक्रिया विश्वासार्ह व पारदर्शक ठेवणे हा आहे. प्रशिक्षणाची तारीख, वेळ व ठिकाण याची माहिती संबंधित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वतंत्रपणे कळविण्यात आली आहे. प्रशिक्षणाकरिता महापालिकेने पूर्वतयारी केली असून अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती बंधनकारक आहे. अनुपस्थित राहणाऱ्या किंवा आदेशांचे पालन न करणाऱ्यांवर राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार फौजदारी कारवाई करण्यात येईल.
-मंगेश चितळे,
आयुक्त तथा निवडणूक अधिकारी, पनवेल
