अलिबाग-वडखळ रस्त्याच्या दुरवस्थेला प्रशासनाची अनास्थाच जबाबदार; पंडित पाटील यांचा आरोप

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

गेले अनेक वर्षे रखडलेल्या अलिबाग-वडखळ रस्त्याच्या दुरवस्थेला राज्य सरकार आणि प्रशासनाची अनास्थाच जबाबदार असल्याची टीका शेकाप नेते, माजी आ.पंडित पाटील यांनी केला आहे.

पंडित पाटील यांनी अलिबाग-वडखळ रस्त्याकडे जिल्हाधिकारी यांनी गांभीर्याने पहावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. पाऊस संपून महिना होत आला तरी अजूनही या मार्गावरील साईडचे गवत काढण्यात आलेले नाही. साईडपट्ट्यांचे कामही करण्यात आलेले नाही. त्यामुळे हे बांधकाम विभाग नेमके करते तरी काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. याच मार्गावरुन दररोज गेल, आरसीएफ, जेएसडब्ल्यू कंपनीची शेकडो वाहने ये-जा करीत असतात त्यामुळे हा रस्ता दिवंसेदिवस खराब होत चालला आहे. या रस्त्याच्या देखभालीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग, नॅशनल हायवे हे मुद्दामपणे दुर्लक्ष करीत आहेत. या रस्त्याची नेमकी मालकी कुणाकडे आहे हे प्रशासनाने जाहीर करावे, अशी मागणीही त्यांनी केली.

विद्यमान सरकारने शहापूरला पेपर मिल आणण्याचा निर्णय घेतला आहे. जर प्रकल्प हवे असतील तर सरकारने आधी या प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या मुलभूत पायाभूत सुविधा पुरविणे गरजेचे आहे. आधी रस्ते नीट करा, मग प्रकल्पाची बात करा, असा टोलाही पंडित पाटील यांनी सरकारला लगावला आहे. यापूर्वी आम्ही आंदोलनाचा इशारा दिल्याने जेएसडब्ल्यूने वडखळ ते धरमतर पर्यंतचा रस्ता करुन दिला आहे. सरकारने जर या रस्त्याच्या दुरुस्तीकडे वेळीच लक्ष दिले नाही तर पुन्हा एकदा आम्हाल याकडे गांभीर्याने पहावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

खराब रस्त्यांमुळे अलिबागच्या पर्यटन व्यवसायावरही विपरित परिणाम झाला असून, रस्ते नीट झाले तरच अलिबाग, मुरुडचे पर्यटन वाढू शकेल, असेही ते म्हणाले. जिल्हाधिकारी दररोज या मार्गावरुन ये-जा करीत असतात त्यांनीही या रस्त्याच्या दुरुस्तीकडे गांभीर्याने पहावे, अशी अपेक्षाही पंडित पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Exit mobile version