तृतीयपंथीयांच्या पाठीशी प्रशासन खंबीर

तहसीलदार विजय पाटील यांची ग्वाही

| पनवेल | वार्ताहर |

तृतीयपंथीयांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. समाजात इतर माणसाप्रमाणे त्यांना मानाचे स्थान देऊया. मुख्य प्रवाहात जगण्याचा अधिकार देऊया. समाजानेही पुढे येऊन त्यांना सहकार्य करावे. महसूल प्रशासनाच्या माध्यमातून तृतीयपंथीयांच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पनवेल तहसीलदार विजय पाटील यांनी केले. स्वातंत्र्यदिनानिमित्त पनवेल महसूल कार्यालयात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

स्वातंत्र्यदिनानिमित्त पनवेल प्रांताधिकारी राहुल मुंडके यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम पनवेल तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात तहसीलदार विजय पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण कार्यक्रम तसेच राष्ट्रध्वज वंदन समारंभ पार पडला. त्यानंतर पनवेल तालुका क्रीडा संकुल येथे प्रांताधिकारी राहुल मुंडके यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी आणीबाणी काळातील स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथीयांचा सन्मान करण्यात आला.

आम्हाला स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रथमच सन्मानाची वागणूक दिली व सन्मानाने निमंत्रण देऊन यथोचित सत्कार केला याबद्दल आम्ही पनवेल महसूल प्रशासनाचे आभार व्यक्त करतो. सन्मानानंतर तृतीयपंथीयांना अश्रू अनावर झाले. आज खराखुरा देश स्वातंत्र्य झाला असून, आमच्या जीवनात अशाप्रकारे सन्मानाची वागणूक कधीच मिळाली नाही, परंतु आजच्या सन्मानाबद्दल आम्ही तहसीलदार व पनवेल महसूलचे आभारी असल्याची भावना तृतीयपंथीयांनी व्यक्त केली.

Exit mobile version