कर्जतकरांच्या जनक्षोभापुढे प्रशासन नरमले

दरवाढ करणार नाही; पालिका
उपोषणाचा निर्णय स्थगित

| कर्जत | संजय गायकवाड |
मालमत्ता करवाढीविरोधात आवाज उठवत आक्रमक झालेल्या कर्जतकरांच्या जनक्षोभापुढे पालिका प्रशासन नरमले आहे. दरवाढीविरोधात ‘आम्ही कर्जतकर’ मोहीम हाती घेत पालिकेला निर्वाणीचा इशारा दिला होता. त्यानुसार नगरपरिषदेने कोणतीही दरवाढ करण्यात येणार नाही, असे लेखी पत्र देऊन उर्वरित विषयावरसुद्धा वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार कार्यवाही करू, असे स्पष्ट केले. त्यामुळे प्रजासत्ताकदिनी 26 जानेवारी रोजी जाहीर करण्यात आलेले साखळी उपोषण स्थगित करण्यात आल्याचे ‘आम्ही कर्जतकर’च्या वतीने सांगून कर्जतकरांच्या एकजुटीचा ऐतिहासिक विजय झाल्याचेही सांगण्यात आले.

कर्जत नगरपरिषदेने शहरातील वीस हजार नागरिकांना मालमत्ता करवाढीबाबत चतुर्थ वार्षिक करवाढीसाठी नोटिसा पाठवल्या आहेत. त्याविरुद्ध कर्जतकर नागरिकांनी एकत्र येत आवाज उठविला आहे. मालमत्ता करवाढीविषयी कर्जत नगरपरिषदेने घेतलेल्या भूमिकेचा निर्णय सांगण्यासाठी आम्ही कर्जतकरच्या सदस्यांनी कर्जतच्या लोकमान्य टिळक चौकात कर्जतकरांना उपस्थित राहण्यास सांगितले होते. त्यानुसार अनेक कर्जतकर उपस्थित राहिले होते. याप्रसंगी रमाकांत जाधव यांनी मालमत्ता करवाढप्रकरणी मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी चांगले सहकार्य केले असून, कर्जतकरांसाठी चांगला निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले. त्यानंतर माजी नगरसेवक प्रवीण गांगल यांनी नगरपरिषदेने दिलेल्या पत्राचे सविस्तर वाचन केले. योगेश पोथरकार यांनी नगरपरिषदेने दिलेल्या पत्रातील काही गोष्टी उपस्थितांना खुलासेवार सांगितल्या.

अ‍ॅड. कैलास मोरे यांनी, हा समस्त कर्जतकरांचा ऐतिहासिक विजय आहे. आपल्या या लढ्याला यश आले असून, त्यामधून अनेक चांगल्या गोष्टी आपल्याला समजल्या असून, नगरपरिषदेने केलेली करवाढ चुकीची होती, हे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, अग्निशमन कर रद्द करण्यात आले आहे. मालमत्तेच्या घसार्‍यावर कर आकारणी करणे. 2021-22 ते 2024-25 कोणतीही करवाढ नाही. तसेच सर्व्हेसाठी नियुक्त केलेल्या ठेकेदाराला सर्व्हेच्या दुरुस्तीसाठी कोणतीही अतिरिक्त रक्कम अदा करण्यात येणार नाही, असे निर्णय घेतले आहेत. तसेच नगरपरिषदेने अनेक करांसाठी वरिष्ठ कार्यालयाच्या मार्गदर्शनानुसार कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिले आहे, असे ते म्हणाले.

दीपक लाड यांनी आपले घर किंवा दुकान काही काळ बंद असल्यास त्याची कर आकारणी कमी होऊ शकते, असे सांगितले. नंदन भडसावळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष धनंजय चाचड, रजनी गायकवाड, राजेश लाड, नगरसेवक सोमनाथ ठोंबरे, मुकुंद मेंढी, धर्मेंद्र मोरे, विकास चित्ते, अशोक शिंदे, हरिश्‍चंद्र यादव, विनोद पांडे, कृष्णा जाधव, शिवसेवक गुप्ता, गणेश ठोसर, डॉ. गीता काळे आदींसह कर्जतकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

26 जानेवारीपासूनचे आंदोलन तूर्तास स्थगित केले आहे. कार्यवाही आपल्याला पटली नाही तर पुन्हा आंदोलनाचे हत्यार आपण उचलू. – अ‍ॅड. कैलास मोरे

Exit mobile version