। कर्जत । वार्ताहर ।
कर्जत नगरपरिषद हद्दीतील नागरी समस्या तशाच आहेत, समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. याविरोधात शहरातील नागरिकांनी 16 डिसेंबरपासून बेमुदत उपोषणास बसले आहेत.
कर्जत नगरपरिषद नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांचा कार्यकाळ संपल्याने मुख्याधिकारी वैभव गारवे प्रशासक म्हणून कारभार पाहत आहेत. नगरपरिषदेच्या भोंगळ कारभाराविरुद्ध गेल्या चार महिन्यांपासून निवेदन, चर्चा करून तसेच नगरपरिषदेला योग्य ती मुदत देऊनसुद्धा नागरी समस्या सुटल्या नाहीत. मुख्याधिकारी निष्क्रिय अधिकारी असल्याचा ठपका ठेवत तसेच कर्जत नगरपरिषद प्रशासनाविरुद्ध आज सोमवारी (दि.16) पासून बेमुदत साखळी उपोषण आंदोलन येथील स्थानिक नागरिकांनी पुकारले आहे.
काय आहेत कर्जतकरांच्या समस्या..!
नागरिकांना शुद्ध आणि नियमित पाणी मिळावे, शहरात सीसीटीव्ही प्रणाली कार्यान्वित करणे, डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमित फवारणी करणे, शहरातील कचरा वेळेवर उचलणे, शहरात एक्स्प्रेस फीडर बसवणे, रस्त्यात अडथळा निर्माण करणारे पोल हटवणे, पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी कठोर पावले उचलावी, पाण्याच्या पाईपलाइनचे नियोजन करणे, फुटपाथवरील अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करणे, बेकायदेशीर हातगाड्यांवर कारवाई करणे. सेंद्रिय कचर्याचा पुनर्वापर होऊन पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मितीसाठी बायोगॅस प्रकल्प त्वरित सुरू करावा. उल्हास नदी स्वच्छतेचे नियोजन करून कचरा टाकणार्यांवर कठोर कारवाई करणे अशा अनेक मागण्या कर्जतकरांच्या आहेत