। अलिबाग । प्रतिनिधी ।
चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकर्यांना उभारी देण्यासाठी पुनर्लागवड व पुनरुज्जीवन योजना सुरु केली होती. रोपे वाटप करण्याबरोबरच रोपांची लागवड करण्यासाठी निधी देऊन शेतकर्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला होता. परंतू रोपांचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकर्यांना खासगी रोप वाटीकेतून रोपे आणावी लागली. त्याचा निधी कृषी विभागाकडून मिळाला नसल्याने गेली दोन वर्षे शेतकरी निधीच्या प्रतिक्षेत होती. याबाबत अनेक शेतकर्यांनी शेकाप सरचिटणीस आ.जयंत पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याकडे गार्हाणे मांडले. अखेर आ. जयंत पाटील यांच्या प्रयत्नाने शेतकर्यांना निधी उपलब्ध झाला असून त्यांच्या खात्यात निधी वितरीत करण्याची प्रक्रिया कृषी विभागामार्फत सुरु करण्यात आली आहे.
योजनेत तरतूद केल्याप्रमाणे रोपे मिळत नसल्याने या शेतकर्यांना खासगी रोपवाटीकांमधून रोपे विकत घेण्याची वेळ आली होती. त्याचा आर्थिक फटका शेतकर्यांना बसला होता. शेतकर्यांच्या या समस्यांबाबत आ. जयंत पाटील यांनी विधान परिषदेमध्ये आवाज उठविला. शेतकर्यांना केवळ दिवा स्वप्न दाखविणार्या कृषी विभागाविरोधात त्यांनी अधिवेशनात आक्रमक भूमिका घेत नाराजी व्यक्त केली. अखेर आ. जयंत पाटील यांच्या मागणीची दखल घेत रायगड जिल्ह्यासाठी सहा कोटी रुपयांचा निधी सरकारकडून देण्यात आला. त्यात अलिबाग तालुक्यासाठी एक कोटी वीस लाख रुपयांच्या निधी वाटपाची प्रक्रिया सुरु झाली आहे.
आ. जयंत पाटील यांनी केलेल्या मागणीमुळे जिल्ह्यातील शेतकर्यांच्या खात्यात त्यांचा निधी वितरीत करण्यास कृषी विभागाने सुरुवात केली आहे. अनेक शेतकर्यांशी संपर्क साधून निधी वितरीत केल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.निधी मिळाल्याने शेतकरी वर्गाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
चक्रीवादळात झालेले नुकसान
जिल्ह्यामध्ये 3 जून 2020 रोजी झालेल्या निसर्ग वादळात नारळ, सुपारी, आंब्यांची झाडे कोलमडून पडली. त्यामध्ये सुपारीचे 824 हेक्टर, नारळाचे सुमारे 752 हेक्टर, काजूचे 1200 हेक्टर व आंब्याचे सुमारे 8 हजार 113 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. निसर्ग चक्रीवादळामुळे फळबागायतदारांच्या उत्पन्नाचे स्त्रोत पुर्णपणे नष्ट झाले होते.