| जालना | प्रतिनिधी |
सगेसोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतचा सरकारने शनिवारी अध्यादेश काढला. ज्याची कुणबी म्हणून नोंद मिळाली आहे, त्याच्या नोंदीच्या आधारावर नोंद नसलेल्या सोयऱ्याला त्या कागदपत्राच्या अंतर्गत एक तरी प्रमाणपत्र मिळायला हवं. हे प्रमाणपत्र मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवणार, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटीत रविवारी सभेदरम्यान घेतला. सगेसोयऱ्यांचा कायदा पास झाला पण फायदाच नाही झाला तर फायदा काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, नव्या अध्यादेशाचं महत्त्व सांगतानाच आंदोलन सुरू ठेवायचं की नाही याबाबतची चर्चाही समाजासोबत केली. नव्या अध्यादेशानुसार जोपर्यंत एखाद्या मराठा समाजाच्या नोंदी नसलेल्या सोयऱ्याला कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन यशस्वी झालं आणि नव्या कायद्याची अंमलबजावणी झाली असं म्हणता येत नाही. त्यामुळे नोंदी नसलेल्या सोयऱ्याला एक तरी प्रमाणपत्र मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.