डांबरी रस्त्याला मातीचा मुलामा
श्रीवर्धन-म्हसळा, दांडगुरीमार्गे वडवली खड्डेमय
| दिघी | वार्ताहर |
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित असलेल्या श्रीवर्धन-बोर्लीपंचतनमार्गे वडवली फाटा या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे आहेत. गंभीर बाब म्हणजे, लाडक्या गणरायाचे आगमन ही याच खड्डेयुक्त रस्त्याने होणार आहे. मात्र, खड्ड्यांचे विघ्न श्रीवर्धनच्या बांधकाम प्रशासनला दूर करता आलेले नाही.
बोर्लीपंचतन शहराची मुख्य बाजारपेठ व शहरालगत ज्ञानमंदिर पर्यंत आणि शिस्ते गावालगत रस्त्याची अनेक वर्षे डागडुजी न केल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. तात्पुरता उपाय म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्याचे कामगार अभियंत्यांच्या अनुपस्थितीत स्वतःहून खड्डे बुजवताना दिसतात. खड्डे व्यवस्थित न बुजवल्यामुळेच खड्ड्यांतील माती वाहून गेली आणि खड्ड्यांनी उग्र स्वरूप धारण केले. खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी भरल्याने त्याच्या खोलीचा अंदाज चुकत असल्यामुळे वाहनचालकांच्या जिवालाच धोका निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे बोर्ली बाजारपेठेत चिखलाचे साम्राज्य वाढल्याने बाजारहाटसाठी आलेल्या नागरिकांना चालणे मुश्किल बनलं आहे. खड्डे बुजवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सुस्त असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.
या रस्त्यांची कामे मंजूर आहेत. आता पावसाळ्यात डांबरीकरण करणे कठीण असल्याने पुढे कामे होतील. सध्या रस्त्यांची दुरुस्ती तात्पुरत्या स्वरूपात करण्यात येत आहे.
– पी.एस. राऊत, उपविभागीय अभियंता, श्रीवर्धन
गावात जाणार्या अंतर्गत रस्त्यांची अवस्था तर आणखी बिकट आहे. याकडे तर कोणाचं लक्ष नसतं. दुरुस्तीसाठी वाट पाहून कंटाळून, शेवटी आम्ही ग्रामस्थांनी श्रमदानातून खड्डे बुजविले.
– विजय कांबळे, कापोली रहिवासी