स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन सुरू; मात्र वाढत्या उष्णतेचा जीवनचक्रावर परिणाम
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
जल निसर्गाचा लहरीपणा आणि बदलत्या वातावरणाचा थेट परिणाम आता पक्ष्यांच्या स्थलांतरावर होऊ लागल्याचे चित्र रायगड जिल्ह्यात दिसत आहे. दरवर्षी मान्सूनच्या आगमनाची चाहूल घेऊन येणारे नवरंग, पट्टेरी कोकीळ यांसारख्या स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन सुरू झाले आहे. पाली सुधागडसह रायगडच्या जंगलांमध्ये या रंगीबेरंगी पाहुण्यांचा किलबिलाट सुरू झाल्याने पक्षी निरीक्षक आणि अभ्यासकांमध्ये कुतूहलासोबतच चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
रोहा येथील पक्षी निरीक्षक रोशन म्हात्रे यांना रोहा, फणसाड अभयारण्य आणि रायगड जिल्ह्याच्या विविध भागांत या पक्ष्यांचे दर्शन झाले आहे. म्हात्रे यांच्या मते, हे पक्षी पावसाळ्याचे दूत मानले जातात. मात्र, यंदा हवामानातील बदलामुळे त्यांच्या जीवनचक्रावर विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. या बदलांबाबत सखोल अभ्यास होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, या पाहुण्यांना पाहण्यासाठी आणि त्यांचे छायाचित्रण करण्यासाठी रायगडच्या जंगलात अभ्यासक व पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. यंदा या पक्ष्यांचे दर्शन सुखावह असले, तरी वाढती उष्णता हे पर्यावरणीय धोक्याचे संकेत तर नाहीत ना, याकडे तज्ज्ञांचे बारीक लक्ष आहे, असे रोशन म्हात्रे यांनी सांगितले.
माणगाव येथील पक्षी अभ्यासक शंतनू कुवेस्कर यांनी या स्थितीवर भाष्य करताना वाढत्या तापमानाबाबत चिंता व्यक्त केली आहे. कुवेसकर म्हणाले की, सध्या तापमानाचा पारा प्रचंड वाढत आहे. हवामान खात्याच्या नोंदी आणि प्रत्यक्ष जमिनीवरील तापमान यामध्ये मोठी तफावत असून जंगलातील उष्णता असह्य आहे. काही पक्ष्यांचा सध्या विणीचा हंगाम सुरू झाला असून, या काळात त्यांना संतुलित तापमानाची गरज असते. मात्र, वाढत्या उष्णतेमुळे अंडी योग्यरीत्या न उबणे, अंड्यांची संख्या घटणे आणि पाण्यासाठी पक्ष्यांची होणारी वणवण, असे प्रतिकूल परिणाम त्यांच्यावर होत आहेत.
पाहुण्या पक्ष्यांची वैशिष्ट्ये
नवरंग याला नऊ रंगांचा पक्षी म्हटले जाते. हिरवा, निळा, पिवळा, काळा आणि लाल अशा गडद रंगांच्या छटा याच्या अंगावर असतात. हे पक्षी प्रामुख्याने दक्षिण भारत आणि श्रीलंकेतून प्रजननासाठी उत्तर व मध्य भारताकडे स्थलांतर करतात. पट्टेरी कोकीळ अंगावर पांढऱ्या आणि तपकिरी रंगाचे आडवे पट्टे असलेला हा पक्षी आपल्या सुश्राव्य लयीसाठी ओळखला जातो. हे पक्षी हवामानानुसार स्थानिक स्थलांतर करतात. तर बुरखाधारी हळद्या हा प्रामुख्याने निवासी पक्षी असला तरी पावसाळ्यात अन्नाच्या शोधात स्थानिक स्थलांतर करतो. गडद पिवळा देह आणि डोक्यावर काळ्या रंगाचा बुरखा ही याची ओळख असून याचा आवाज बासरीसारखा मंजुळ असतो.







