| खोपोली | प्रतिनिधी |
वावोशी येथे भारतीय बौद्ध महासभा, तालुका शाखा खालापूर व शहर शाखा खोपोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वर्षावास धम्म प्रवचन मालिकेमधील 13वे पुष्प उत्साहात संपन्न झाले. यावेळी प्रवचनकार आयु. सचिन केदारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मक्रांती या विषयावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करत ऐतिहासिक घटनांचा आढावा घेतला. तसेच बौद्ध समाजातील तरुण पिढीने आपापसांतील मतभेद दूर करून एकजुटीने बाबासाहेबांचे विचार आणि परिवर्तनाची चळवळ पुढे न्यावी, असे आवाहन केले. दरम्यान, भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अरुण गायकवाड यांनी 8 मार्च 2027 रोजी खोपोली येथे भव्य महिला धम्म मेळावा आयोजित करण्याची घोषणा केली.
प्रवचनादरम्यान सचिन केदारे यांनी तथागत गौतम बुद्धांचे विचार, सम्राट अशोकाचे धम्मप्रसारातील योगदान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अस्पृश्यतेविरोधातील संघर्ष, महाडचा चवदार तळे सत्याग्रह, मनुस्मृती दहन, येवला येथील धर्मांतराची घोषणा आणि नागपूर येथील ऐतिहासिक धम्मदीक्षा यांचे महत्त्व विशद केले. 14 ऑक्टोबर 1956 रोजी बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या घटनेला 70 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर तरुण पिढीने बाबासाहेबांच्या विचारांचा सखोल अभ्यास करावा, शिक्षण आणि सामाजिक कार्यात पुढे यावे, तसेच मतभेद दूर करून एकोप्याने राहावे, असे आवाहन केदारे यांनी केले.
वावोशीत बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीचा जागर
