सुदैवाने मोठा अनर्थ ठरला
। पाली । वार्ताहर ।
पालीहून पाच्छापूरला जात असणार्या एसटी बसचा एक्सेल बाहेर येऊन चाक निघता निघता वाचले. त्यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, एसटी बसचालक व वाहकाच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला.
सोमवारी (दि.5) सकाळी साडेआठच्या दरम्यान पालीहून पाच्छापूरला जाणार्या दर्यागाव एसटी बसचा पाच्छापूर फाट्यावर अचानक आवाज येऊ लागला. काही प्रवाशांनी हा आवाज ऐकला व कंडक्टरला एसटी थांबविण्यास सांगितली. चालकाने त्वरित एसटी बस थांबविली व गाडीतून खाली उतरून पाहिले तर बसच्या मागच्या बाजूच्या चाकातला एक्सेल बाहेर आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे प्रवाशांच्या प्रसंगवधानाने मोठा अपघात होण्यापासून टळले.
पाच्छापूर फाटा ते पाच्छापूर गावापर्यंतचा रस्ता हा चढणीचा व दुरवस्थेत आहे. रस्त्यावरचे डांबर जाऊन रस्त्यावर खड्डे पडून मोठ मोठी दगडे रस्त्यावर पसरली आहेत. वेळीच प्रवाशांच्या ही गोष्ट लक्षात आली नसती तर बसच्या चाकातून एक्सेल बाहेर येऊन एसटी कोसळून मोठा अपघात झाला असता. एसटी बसमध्ये बसलेल्या अनेक प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या असत्या. त्यामुळे अशा लांबच्या प्रवासाला जात असताना चालकाने व वाहकाने वाहनाची योग्य ती पाहणी करणे गरजेचे होते. या निष्काळजीपणामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला.