रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; रस्त्यावर सापडलेली पिशवी मालकास सुपूर्द

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
दि.१८ जुलै, सोमवार दि १८ जुलै रोजी दुपारच्या सुमारास अलिबाग तालुक्यातील भाल गावाजवळील रस्त्यावर रोख रक्कम व महत्त्वाची कागदपत्रे असलेली पिशवी रिक्षाचालक अमीन मुल्ला यांना सापडली असता मुळ मालकास संपर्क साधून परत केली, याबद्दल रिक्षाचालक यांचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अलिबाग-रेवस मार्गावरील भाल गावाजवळ रस्त्यावरून रिक्षाचालक अमीन मुल्ला हे रिक्षा घेऊन जात असताना त्यांना भररस्त्यात एक पिशवी पडलेली दिसली,त्या पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये रोख रक्कम, बँकेचे पासबुक,चेकबुक व कोऱ्या चेकवर सही असलेले चेक व इतर महत्त्वाची कागदपत्रे असलेली सदर पिशवी सापडली. त्या कागदपत्रांची तपासणी केली असता ती पिशवी परहूरपाडा येथील जयराम बाळकृष्ण नाईक यांची असल्याचे दिसून आले, सदर पिशवीचे मूळमालक यांच्याशी त्वरित संपर्क साधून जशासतशी सुपूर्द केली.

याबाबत पिशवी मालक जयराम नाईक यांनी सांगितले की, मी परहूरपाडा ते अलिबाग रेवस मार्गाने अलिबागकडे महत्वाच्या कामानिमित्त जात असताना माझी पिशवी हरवली होती, तरी सदर पिशवी मला रिक्षाचालक अमीन मुल्ला यांनी परत दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो,अशी माणसे समाजात फार कमी आहेत,मी रिक्षाचालक यांचा ऋणी आहे, असे सांगितले.या महान कार्याबद्दल प्रामाणिक रिक्षाचालक अमीन मुल्ला यांचे सर्वस्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
रिक्षाचालक अमीन मुल्ला हे अलिबाग शहरात रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करतात, घरची बेताची परिस्थिती असूनसुद्धा त्यांना अश्या मौल्यवान वस्तूंचा कोणताही मोह झाला नाही,ते रिक्षा चालवण्यासोबतच अलिबागमध्ये पर्यटकांसाठी टुरिस्ट गाईड म्हणून कार्य करत अलिबाग शहर व परिसरातील प्रेक्षणीय स्थळांची अनमोल माहिती देण्याची कामगिरी करतात, त्यांना यापूर्वीही अशाच प्रकारे अनेकदा बॅगा,पर्स व इतर मौल्यवान वस्तू, कागदपत्रे मिळाली असता ती त्यांनी कोणत्याही प्रकारची प्रसिद्धी व मोबदला न घेता मुलमालकांस परत केली आहेत. याबद्दल अनेकांनी त्यांच्या प्रामाणिकपणा बद्दल कौतुकाचा वर्षाव करत त्यांचे आभार मानले आहेत.

Exit mobile version