‘रयत’चा वटवृक्ष फुलविला – आ. बाळाराम पाटील

रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तसेच शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस राहिलेले प्राध्यापक एन डी पाटील यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर खूप वाईट वाटले. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन म्हणून त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य त्याच नेटाने सुरू ठेवून रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष मोठा होण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला आहे. सहकार मंत्री म्हणून त्यांनी केलेले कार्य अत्यंत मोलाचे आणि महाराष्ट्र राज्याला तहहयात दिशादर्शक असे राहिले आहे. शेतकर्‍यांच्या शेतीमालाला किफायतशीर किमतीची हमी मिळवून देणे, घाऊक व्यापाराचे राष्ट्रीयकरण करणे, कापूस एकाधिकार योजना राबविणे अशी त्यांनी केलेली ठळक कामे कायम स्मरणात राहतील.
शेतकरी, शेतमजूर,कामगार,कष्टकरी वर्गाचे  सच्चे नेतृत्व आज हरपले आहे. एक विचारवंत आणि विचारधारेची कास धरून गरज पडल्यास पराकोटीचा संघर्ष करायची तयारी ठेवलेले नेतृत्व हरपले त्याचे दुःख वाटते.  एन डी काकांशी माझा व्यक्तिशः निकटचा परिचय होता, माझे वडील मा आमदार दत्तूशेठ पाटील यांचे त्यांच्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते, त्यामुळेच आमच्या कुटुंबाचे एन डी  काकांच्या सोबत पाच दशकांहून अधिक काळ खूप जवळचे संबंध राहिले आहेत.रायगडात विशेष करुन पनवेल,उरणमध्ये जी जी जनहिताची आंदोलने शेकापतर्फे करण्यात आली.त्या प्रत्येक आंदोलनात आम्हाला आधार देण्यासाठी एनडी आवर्जून उपस्थित रहात असत.त्यांचा मोठा आधारच आम्हाला स्फूर्ती देत असे.तोच आधार आता नाहीसा झालेला आहे. पनवेल उरण शेतकरी कामगार पक्ष, रयत शिक्षण संस्था रायगड विभाग आणि माझ्या कुटुंबियांच्या वतीने प्राध्यापक एन डी पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

Exit mobile version