गाढेश्वर धरण, कुंडी धबधबा, वारदोली धबधब्यावर जाण्यास बंदी
। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल परिसराचा झपाट्याने विकास होत असला तरीदेखील येथील निसर्गाचे सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालत आहे. पावसाळ्याच्या दिवसात येथील मनमोहक सौंदर्य पर्यटकांना त्या ठिकाणी जाण्यास प्रवृत्त करतो. तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाढी नदी, गाढेश्वर धरण, मोरबे धरण, कुंडी धबधबा, वारदोली धबधबा या परिसरात येणार्या पर्यटकांच्या जीवावर बेतत आहे. या परिसरात जाताना पर्यटक स्वतःचा मृत्यू ओढवून घेत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून येथे जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
जून महिना सुरू झाला असून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सगळीकडे हिरवीगार झाडे उगवली आहेत. निसर्गाचे मनमोहक सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करत आहे. पावसाळा सुरू झाला की, पर्यटकांना ओढ लागते ती पावसाळी सहलींची. पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील गाढेश्वर धरण, कुंडी धबधबा, कुंडी धबधब्या जवळील टी जंक्शन, गाढेश्वर मंदिर लगत रोडवर नदी पात्र, वारदोली धबधबा अशा पाच ठिकाणी पावसाळी आनंद घेण्यासाठी येणार्या पर्यटकांना मज्जाव करण्यासाठी मनाई आदेशांची सर्वाना माहिती व्हावी या उद्देशाने सूचनांचे फ्लेक्स तालुका पोलिसांतर्फ लावण्यात आले आहेत.
तालुका परिसरात पावसाळी आनंद घेण्यासाठी येणार्या पर्यटकांना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातुन मज्जाव करण्यात आले आहे. तसे बॅनर देखील लावले आहेत. तसेच सदर ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करीत आहोत.
रवींद्र दौंडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल तालुका पोलीस ठाणे