दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सराफ बाजार लखलखला
अलिबाग । वर्षा मेहता ।
धनत्रयोदशीपासून दिवाळीच्या पाच दिवसीय सणाची सुरुवात होते. धनत्रयोदशीचा दिवस खूप शुभ मानला जातो; कारण लोक सोने, नवीन भांडी, लक्ष्मी-गणेशाच्या मूर्ती आणि इतर गृहोपयोगी वस्तू खरेदी करतात. अश्विन वद्य त्रयोदशी अर्थात धनत्रयोदशी साजरी केली जाते. धनत्रयोदशीचा मुहूर्त साधून मंगळवारी शहरातील सराफ बाजारात अनेकांनी सोने खरेदीसाठी गर्दी केली होती.
गेल्या वर्षी कोरोना महामारीमुळे फारसा व्यवसाय झाला नाही; मात्र यावर्षी कोरोना नियमांच्या निर्बंधात शिथिलता आल्यामुळे लोकांचे व्यवसाय पुन्हा सुरू झाले आहेत. परिणामी अर्थव्यवस्था पूर्णपणे नाही तर काही प्रमाणात स्थिर झाली आहे. वर्षभरापासून सुवर्णबाजारात असलेली मंदी या खरेदीमुळे दूर झाली असल्याचेही अनेक व्यापार्यांनी सांगितले.
सोन्याच्या दागिन्यांचा सोस महिलांमध्ये जास्त असतो. यामुळेच सोनेखरेदीसाठी विशेष करून महिलांची जास्त गर्दी होती. बाजारात दागिन्यांबरोबरच सोन्याची नाणी, लक्ष्मीच्या मूर्ती, दागिने खरेदीसाठी महिलांनी प्राधान्य दिले. दिवाळीनंतर विवाहमुहूर्त सुरू होत आहेत. त्यामुळे काही ग्राहकांकडून सोने खरेदी करण्यात आल्याचे व्यापार्यांनी सांगितले. काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत झालेली घसरणदेखील सोने खरेदीसाठी ग्राहकांमध्ये उत्साह वाढविणारी ठरली.
अलिबाग येथील सनगोल्ड ज्वेलर्सचे राकेश सोनी यांनी सांगितले की, कोरोनामुळे व्यवसाय 50 टक्क्यांवर आला होता; परंतु आता परत व्यसाय सुरळीत होईल, अशी अपेक्षा आहे. धनतेरसच्या दिवशी जास्त मागणी ही चांदीच्या नाण्यांना आहे, असेही त्यांनी सांगितले.
दिवाळीचे तसे सगळेच दिवस सोनं किंवा दागिने खरेदीसाठी शुभ मानले जातात. त्या अनुषंगाने नवीन डिझाइन लाँच केली जाते. यावर्षी प्रसिद्ध वामन हरी पेठे ज्वेलर्स यांनी मडायमंड नाविण्य कलेक्शनफ लाँच केले आहे. हे पारंपारिक आणि आधुनिक डिझाइनचे मिश्रण आहे, जे सर्व वयोगटांना आवडेल, असे वामन हरी पेठे ज्वेलर्सचे अलिबागचे व्यवस्थापक नितीन घरत म्हणाले.
दिवाळीच्या निमित्ताने विविध स्टोअर्समध्ये सोन्याच्या मेकिंग चार्जेसमध्ये सवलतीच्या ऑफर आहेत. ज्यामुळे अनेक खरेदीदारांनी दुकानात गर्दी केली होती.
या वर्षी शोरूममध्ये येणार्या ग्राहकांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढली आहे; कारण गेल्या वर्षी कोव्हिडमुळे ग्राहकांची संख्या कमी झाली होती. पण आता पुन्हा दसर्यापासून लोक येत आहेत. दिवाळीसारखे सणासुदीचे दिवस सोने, हिरा किंवा चांदी यासारख्या शुद्ध भेटवस्तू खरेदी करण्यासाठी शुभ दिवस असतात.
नितीन घरत, व्यवस्थापक वामन हरी पेठे ज्वेलर्स अलिबाग
धनत्रयोदशीच्या दिवशी सोने-चांदीचे दर
सोनं- 46,400 (10 ग्रॅम)
चांदी- 68,000 (1 किलो)