। आगरदांडा । वार्ताहर।
चक्क चार पिढ्यांपासून भगत कुटुंब हे गणेशमूर्ती साकारत आहेत. मुरूड शहरातील मधली आळीतील योग विनायक आर्ट ही चित्रशाळा असून तिला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. या गणेश चित्र शाळेत सुबक मूर्ती बनवल्या जातात भगत कुटुंब यांच्या चार पिढ्या येथे गणेशमूर्ती घडविण्याचे काम करत आहेत. जनार्दन भगत यांनी या गणेश चित्रशाळेला सुरुवात केली तद्नंतर विनायक भगत आणि त्यानंतर विजय(भाऊ)भगत 50 वर्ष गणेशमूर्ती घडवण्याचे काम करत आहेत. आता चौथी पिढी त्याचा मुलगा युवराज भगत पुढे वारसा चालवत आहे. त्याच्याबरोबर त्यांची पत्नी युविका भगत यांची साथ मिळत असून त्या गणपतीला दागिन्यांनी सजवण्याचे काम उत्तम प्रकारे करत असतात.
घरातील सर्व कुटुंब गणेशाची मूर्ती घडवताना पाहायला मिळतात. गणपतीची रेखीव म्हणजे डोळे काढण्याचं अवघड काम विजय भगत यांच्या पत्नी गौरी भगत करित असतात. त्यांच्या आखणीचे काम सुंदर असल्याने दरवर्षी गणेशभक्त आकर्षित होत असतात. विजय(भाऊ) भगत यांना नगरपरिषद कार्यालयातर्फे पुरस्कार देण्यात आले आहेत. या चित्रशाळेत 350 गणेशमूर्ती घडवल्या जातात. 1 फुटापासून ते 6 फुटांपर्यंत पर्यावरणपुरक गणेशमूर्ती बनवतात. शाडुच्या मातीच्या देखण्या आणि रेखीव गणेशमूर्ती योग विनायक आर्ट-विजय भगत यांच्या चित्रशाळेतून अनेक गणेशभक्त घेऊन जातात.
भगत कुटुंब चार पिढ्यांपासून साकारताहेत गणेशमूर्ती
