लोहारे येथील जनसंवाद दौऱ्यात अनंत गीते कडाडले
| पोलादपूर | प्रतिनिधी |
महाराष्ट्रामध्ये 106 आमदार असल्याने सत्तेपासून दूर राहिलेल्या भाजप आणि फडणवीसांनी अनेक वर्षे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या मदतीने सत्ता मिळवली, त्या शिवसेनेसमोर मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, अशी सत्तेची लालसा व्यक्त केली आणि पुन्हा सत्तेत येता आले नाही म्हणून शिवसेना फोडून सत्ता मिळवली. परंतु, ही सत्ता अल्पायुषी ठरेल, अशी शंका वाटल्याने राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. यामुळे केवळ सत्तालालसेपोटी महाराष्ट्रातील आणि देशातील पक्ष फोडून भाजपाने त्या पक्षांतील भ्रष्ट लोक घेऊन लोकसभेनंतरच्या सत्तेची गणितं जमविण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत, या प्रयत्नांना बकासुरासारखे स्वरूप आले आहे. पक्ष फोडा आणि भाजप वाढवा, असे गलिच्छ राजकारण भाजप ज्या काँग्रेसने 70 वर्षांमध्ये काय केले असा प्रश्न विचारते, त्या काँग्रेसनेही कधी केले नाही. त्यामुळे या भाजप अन् फडणवीसरूपी बकासुराच्या वधासाठी भीमरूपी जनता सज्ज असल्याचा ठाम विश्वास शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि इंडिया आघाडीचे उमेदवार माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी व्यक्त केला.
पोलादपूर तालुक्यातील लोहारे येथे जनसंवाद दौऱ्यामध्ये माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्यासमवेत व्यासपीठावर जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, जिल्हासंपर्कप्रमुख संजय मानाजी कदम, जिल्हा उपसंघटक बाळ राऊळ, महाड विधानसभा मतदार संघाच्या संभाव्य उमेदवार स्नेहल जगताप-कामत, राजिमस बँकेचे संचालक हनुमंत जगताप, अमित मोरे, तालुकाप्रमुख अनिल मालुसरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदश्चंद्र पवार गटाचे कृष्णा करंजे, शेकापक्षाचे वैभव चांदे, काँग्रेसचे रघुनाथ वाडकर, संभाजी साळुंखे, सोमनाथ ओझर्डे, धनंजय देशमुख, स्वीटी गिरासे, जनार्दन मानकर तसेच महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
अनंत गीते यांनी पुढे बोलताना, महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्यात महिला आघाडीचा वाटा वाघिणीचा असावा अशी अपेक्षा व्यक्त करताना 52 टक्के महिला मतदार आहेत. महिला मशालीसारख्या धगधगत्या असल्या तर घरातील सर्वांचे मतदान मशालीच्या चिन्हावर होईल. दोन लाखांपेक्षा अधिक मताधिक्य इंडिया आघाडीच्या माध्यमातून घेऊन विजयी होणार असल्याचा दावा गीतेंनी यावेळी केला.
सैतानाला बाटलीबंद करा, बूच लावण्याचे काम मी करेन.. महाड विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार माणिकराव जगतापांची एक व्हिडीओ क्लीप फिरतेय. माणिकरावांनी जाता जाता सांगितले की, गीतेंसारख्या चारित्र्यवान नेत्याला पराभूत करण्याचे पाप घडले. आता सैतानाला बाटलीबंद करण्याचे काम उर्वरित काळात करणार. आता तोच सैतान आपणासमोर निवडणुकीत उमेदवार असल्याने ते सैतानाला बाटलीबंद करण्याचे काम मतदार करतील आणि मतदानानंतर त्या बाटलीला बूच्च लावण्याचे काम मीच करणार, असा निर्धार अनंत गीते यांनी साखर येथे केला.
यावेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, महाड विधानसभा मतदारसंघाच्या संभाव्य उमेदवार स्नेहल जगताप-कामत, संपर्कप्रमुख संजय मानाजी कदम, जिल्हा उपसंघटक बाळ राऊळ, अजय सलागरे, धनंजय देशमुख, राजिमस बँकेचे संचालक हनुमंत जगताप, तालुकाप्रमुख अनिल मालुसरे, शेकापक्षाचे वैभव चांदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदश्चंद्र पवार गटाचे कृष्णा करंजे, बाळ राऊळ, स्वीटी गिरासे, अमित मोरे, पद्माकर मोरे, सुरेंद्र चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते. अनंत गीते म्हणाले की, ज्यांनी निष्ठेला कलंक लावून गद्दारी केली; त्यांना धडा शिकविण्यासाठी निवडणूक लढायची आणि जिंकायची आहे. महाराष्ट्रात 59 टक्क्यांची इंडिया आघाडी एकत्र होईल तेव्हा भाजपसोबतची एनडीए आघाडी देशातून राज्यातून हद्दपार होईल. अनंत गीतेच्या चारित्र्यावर डाग लागला नाही आणि यापुढेही लागणार नाही. स्नेहलसाठी रेड कार्पेट अंथरून त्यावरून स्नेहल जगताप कामत यांना विधानसभेत पाठवणार, असा दृढनिर्धार यावेळी अनंत गीते यांनी व्यक्त केला.