| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
सुधागड तालुका बौद्धजन पंचायत रजि. नं. 2756 या संस्थेच्या वतीने पालीत विश्ववंदनीय तथागत गौतम बुद्ध यांचा जयंती सोहळा व भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
सकाळी पंचशील व निळ्या ध्वजाचे ध्वजारोहन करून बौद्धचार्य गण व श्रामनेर संघ यांच्या उपस्थितीत बुद्ध पुजापाठ घेण्यात आला. या जयंती महोत्सवाकरिता सुधागड तालुका बौद्धजन पंचायतीचे पदाधिकारी, महिला, पुरुष सभासद, युवक, युवती, धम्मबांधव, भिमानुयायी मोठया संख्येने उपस्थित होते. जयंतीनिमित्त प्रसिद्ध व्याख्याते दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांचे प्रबोधन ऐकण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
सायंकाळी पाली बाजारपेठेतून महापुरुषांच्या प्रतिमांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. तरुण, महिला, पुरुष व लहानग्यांनी डीजेच्या तालावर आनंद साजरा केला. यामध्ये खास आकर्षण ठरले ते लेझिम डान्स. लहान मुलींसहित महिला वर्ग या लेझिम नृत्यात सहभागी होते. या मिरवणुकीत व जयंती महोत्सव कार्यक्रमात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम पाली पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी चोखपणे पार पाडले. छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ मिरवणूकीची सांगता करण्यात आली.







