घरफोड्यांचा सुळसुळाट; मालमत्ता सुरक्षेचा प्रश्न टोकाला
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील सहा महिन्यांपासून चोरी आणि घरफोडीच्या घटनांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. नागरिकांच्या मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून, बंद घरांना टार्गेट करून चोरटे दिवसा-रात्री कोणत्याही वेळी धाड टाकत आहेत. ऐवज लंपास करून चोरटे सहजपणे पसार होत असून, पोलिसांपुढे त्यांनी जणू उघड आव्हानच उभे केले आहे. त्यामुळे या गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यात पोलीस अपयशी ठरत आहेत का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
मागील महिन्यात आंबेपूर येथे घडलेली घटना याच निष्क्रियतेचे उदाहरण ठरली आहे. 14 ते 17 एप्रिलदरम्यान रात्रीच्या सुमारास एका बंद घरात चोरट्याने प्रवेश करून किचनमधील फ्रिजवर ठेवलेले सोन्याचे मंगळसूत्र लंपास केले. ही बाब लक्षात येताच तक्रारदाराने रेवदंडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दाखल केली. मात्र, या घटनेनंतरही तपासाची गती शून्यच असल्याची भावना व्यक्त होत आहे.
याआधी महाजने परिसरात सहा महिन्यांपूर्वी दोन ठिकाणी मोठ्या घरफोड्या झाल्या होत्या. अज्ञात चोरट्यांनी लाखोंचा ऐवज दागिने, रोकड आणि इतर मौल्यवान वस्तू लंपास केल्या. या प्रकरणांतही गुन्हे नोंदवले गेले, पण त्यानंतर तपासाचा मागमूसही नाही. आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याचे बोलले जात आहे.
रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठिकठिकाणी वाढलेल्या चोरी आणि घरफोड्यांच्या घटनांनी नागरिक भयभीत झाले आहेत. पोलिसांचा धाक संपल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. गुन्हे नोंदवून महिने उलटले तरी तपासात कोणतीही ठोस प्रगती दिसत नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निष्क्रियता, ढिसाळ तपास आणि गुन्हेगारांवरील नियंत्रणाचा अभाव यामुळे रेवदंडा पोलिसांविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.







