उमेदवारावर विनयभंगासह गंभीर गुन्हे
| अलिबाग | प्रतिनिधी |
बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपीला बदलापूर कुळगाव नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक केल्याच्या प्रकरणावरून अवघ्या 24 तासांत राजीनामा घ्यावा लागलेल्या भाजपवर टीकेची झोड उठलेली असतानाच, आता पनवेल महानगरपालिकेतही विनयभंगासह विविध गंभीर गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीस उमेदवारी दिल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. कामोठे प्रभाग क्रमांक 11 (क) मधून भाजपने चरणजित सिंग उर्फ ‘हॅपी’ याला उमेदवारी दिल्याने भाजप हा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना पाठीशी घालणारा पक्ष असल्याची जोरदार टीका होत आहे.
कामोठे प्रभाग क्रमांक 11 (क) मधून हॅपी सिंगला उमेदवारी देत भाजपने महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर केलेल्या सर्व घोषणा स्वतःच पायदळी तुडवल्याचा आरोप होत आहे. 2017 मध्ये भाजपकडून निवडून आलेले आणि पक्षाशी निष्ठावान असलेले गोपीनाथ भगत या स्थानिक मराठी उमेदवाराला बाजूला सारून, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला पुढे आणणे हा प्रशांत ठाकूर यांच्या ‘पॉवर पॉलिटिक्स’चा भाग असल्याचे बोलले जात आहे.
हॅपी सिंग याच्यावर विनयभंग (कलम 354-ब, 509), बेकायदेशीर जमाव, दंगल, घरात घुसून मारहाण, फौजदारी धमकी, मालमत्तेचे नुकसान यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचा आरोप आहे. तरीही त्याला केवळ निवडणुकीचे तिकीटच नव्हे, तर प्रशांत ठाकूर यांच्या शिफारसीवरून राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्यपदावरही स्थान मिळाल्याची चर्चा आहे. यामुळे ‘गुन्हे दाखल असलेले लोक प्रशांत ठाकूर यांच्या जवळचे असतील, तर त्यांना कायदा लागू होत नाही का?’ असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
एकीकडे बदलापूर प्रकरणात भाजपला अवघ्या 24 तासांत माघार घ्यावी लागलेली असताना, दुसरीकडे पनवेलमध्ये त्याच धर्तीचा निर्णय घेणे म्हणजे भाजप नेतृत्वाला जनतेच्या रोषाची भीती उरलेली नाही, की प्रशांत ठाकूर यांचे राजकीय वजन इतके वाढले आहे की पक्षही गप्प बसतो आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
‘सुशासन’ आणि ‘शून्य सहनशीलता’च्या गप्पा मारणाऱ्या भाजपमध्ये प्रत्यक्षात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना संरक्षण देणारी यंत्रणा कार्यरत असल्याचे चित्र पनवेलमध्ये स्पष्टपणे दिसून येत असून, या सर्व प्रकाराची नैतिक आणि राजकीय जबाबदारी आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजप नेतृत्वावरच येऊन ठेपत असल्याची चर्चा तीव्र झाली आहे.
चरणजित सिंग उर्फ हॅपीवर दाखल असलेले गुन्हे
कलम 354(ब) महिलेवर हल्ला करून विनयभंग/जबरदस्तीने कपडे काढण्याचा प्रयत्न
कलम 509 महिलेचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने अपमानास्पद शब्द, हावभाव
कलम 143 बेकायदेशीर जमावाचा सदस्य
कलम 147 दंगल
कलम 149 बेकायदेशीर जमावातील प्रत्येक सदस्यावर सामूहिक गुन्ह्याची जबाबदारी
कलम 452 घरात घुसून मारहाणीची पूर्वतयारी
कलम 427 मालमत्तेचे नुकसान/तोडफोड
कलम 323 स्वेच्छेने दुखापत पोहोचवणे
कलम 504 शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान
कलम 506 फौजदारी धमकी (जीवे मारण्याची धमकी)
वीजचोरीचा गुन्हा महावितरण अंतर्गत नोंद असल्याची चर्चा
राजकीय नैतिकतेची राखरांगोळी
पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या राजकीय छत्रछायेखाली गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे पुनर्वसन सुरू असल्याचा गंभीर आरोप पुन्हा एकदा पुढे आला आहे. महिलांवरील विनयभंग, दंगल, जीवे मारण्याचा प्रयत्न यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या चरणजित सिंग उर्फ ‘हॅपी' याला भाजपकडून आ. ठाकूरांच्या शिफारसीवरुन पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी देऊन राजकीय नैतिकतेची अक्षरशः राखरांगोळी केली आहे. त्यामुळे भाजपा हा गुन्हेगारांचा पक्ष असल्याची टीका राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.
