| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील थळ येथील डोंगरभागात एका 31 वर्षीय तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. ही घटना गुरुवारी सकाळी घडली असून या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रीया सुरु आहे.
अलिबाग तालुक्यातील थळ येथील डोंगरभागात एका तरुणाचा मृतदेह आदिवासी व्यक्तीला गुरुवारी सकाळी आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच अलिबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची पाहणी केल्यावर त्याच्या बाजूला एक बॅग आढळून आली. त्यामध्ये त्याचे ओळखपत्र होते. त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक माहितीनुसार निदर्शनास आले आहे.
अभिजीत लांडे असे या तरुणाचे नाव आहे. हा तरुण सोलापूर जिल्ह्यातील असून दिवाळीनंतर पुणे येथे कामाला जातो, असे सांगून गेला होता. मात्र, त्याचा मृतदेह अलिबाग तालुक्यातील थळ येथील डोंगरभागात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. सोलापूरमधील तरुणाच्या मृत्यूने खळबळ उडाली असून त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही, अशी माहिती अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी दिली.