डोणवत धरणाने गाठला तळ

जलजीवन मिशन योजना राबणार कशा?

| खोपोली | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील लघुपाट बंधारे विभागातील धरणांद्वारे जिल्ह्यातील लाखो नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. या धरणांमध्ये सरासरी 50.52 दशलक्ष घनमीटर इतका जलसाठा शिल्लक राहिला असून, 14 धरणांमध्ये 50 टक्क्यांहून कमी जलसाठा असल्याचे आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे. दरम्यान, खालापूरमधील डोणवत धरणाने तळ गाठला असून, 50 टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी आतापासूनच वणवण फिरण्याची वेळ आली आहे.

खालापूर तालुक्यातील वावोशी विभागात जलजीवन योजनेंतर्गत कामे सुरू आहेत. त्यामध्ये वावोशी गाव, गोरठण, होराळे, परखंदे, कोयना शिंदीवाडी आपटी, जांभिवली, शिरवली या गावांतील जलजीवन योजना डोणवत धरणाच्या पाण्यावर व बाळगंगा नदीवर अवलंबून असल्याने या योजनेचे काय होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. लाखो रुपये खर्च करून शासन मूलभूत सुविधा देण्याचे काम करत असताना या योजनेचे नियोजनबद्ध आराखडा तयार न केल्यामुळे योजनेचे काम अपूर्ण होत नसल्याने जनतेमध्ये आक्रोशाची भावना निर्माण झाली आहे. या योजनेच्या अभियंत्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून मगच काम पूर्ण झाल्याचे बिल काढावे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

रायगड जिल्ह्यातील 28 धरणे लघु पाटबंधारे विभागातील सुधागड, महाड, खालापूरमध्ये लहान धरणांची संख्या अधिक आहे. या धरणांमधून रायगडसह अन्य नवी मुंबई येथील नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. यंदा पाऊस समाधानकारक पडल्याने धरणे शंभर टक्के पाण्याने भरून गेली. त्यामुळे पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही, अशी आशा निर्माण झाली होती. परंतु, वाढत्या तापमानामुळे पाण्याचा वापरही प्रचंड होऊ लागला आहे. कारखानदारांच्या अतिपाण्याच्या वापरामुळे धरणांमधील पाण्याची पातळीदेखील कमी होऊ लागली आहे. त्यामुळे तालुक्यात पाण्याची टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. पावसाळा सुरु होईपर्यंत नागरिकांना मुबलक पाणी मिळावे यासाठी पाणीकपात करण्याचे संबंधित यंत्रणांनी सुरु केले आहे. नागरिकांनीदेखील पाणी जपून वापरण्याची सवय लावून घ्यावी, जेणेकरून पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही.

पाणीकपातीचे संकट
जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. पावसाळा सुरु होण्यापूर्वी हा जलसाठा नागरिकांना उपलब्ध व्हावा यासाठी लघुपाटबंधारे विभागाने पाणीकपातीला सुरुवात केली आहे. मे महिन्यात पाण्यासाठी वणवण होऊ नये यासाठी ठिकाणी दिवसाआड पाणीकपात सुरु केली आहे. या पाणीकपातीचे संकट निर्माण झाल्याने पाणी जपून वापरण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि स्थानिक छत्तीशी भागातील पंचायतीचे सरपंच यांची बैठक काही दिवसांपूर्वी झाली आहे. जलजीवनच्या योजना आराखड्याप्रमाणे सुरू आहेत. कोणत्याही ठेकेदाराला पूर्ण काम झाल्याशिवाय आणि नागरिकांना मुबलक पाणी मिळाल्याशिवाय पेमेंट काढणार नाही. ग्रामस्थांच्या मागणीनुसार या योजनेचे काम सुरू आहे. जर कोणतीही तक्रार असेल, तर माझ्याशी संपर्क साधावा.

श्री. चव्हाण,
अभियंता, कर्जत, जलजीवन योजना
Exit mobile version