धुळीने कोंडला चालकांचा श्वास

| महाड | वार्ताहर |

महाड औद्योगिक क्षेत्रामधील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील धुळीमुळे वाहनचालकांसह प्रवाशांमध्ये दमा व खोकल्याचे आजार बळावत आहेत. खराब रस्त्यांमुळे औद्योगिक क्षेत्रातील अवजड वाहतूक संथगतीने होत असल्याने अन्य चालकांना त्रास सहन करावा लागतो.

महाड औद्योगिक क्षेत्रामध्ये जाण्यासाठी महामार्गावरील नागलवाडी फाटा येथून रस्ता जातो. या रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने तसेच मूळ काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने मोठ मोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागली. आता रस्त्यावरील खड्डे बारीक खडीने बुजवले जात आहेत. त्यातच रुंदीकरणासाठी रस्त्यालगतची झाडे तोडल्याने मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरले आहे.

महाड औद्योगिक क्षेत्रातील रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन मीटर याप्रमाणे चार मीटरच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. सध्या अस्तित्वात असलेला रस्ता वाहतुकीसाठी योग्य असतानाही रुंदीकरणाचा घाट घातला जात असल्याने कामाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. रस्ता रुंदीकरणासाठी सुमारे 16 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. दोन्ही बाजूने रुंदीकरण होत असताना सुमारे शंभर वर्षांपूर्वीचे जुने वृक्ष तोडले गेले आहेत. त्यामुळे सावली नाहिशी झाली असून वाहनचालक व पादचाऱ्यांना धुळीचा त्रास सहन करावा लागतो. मूळातच खराब रस्त्यामुळे वाहने सावकाश चालवली जात असताना धुळीमुळे वाहनचालकांच्या दमा-खोकल्याचा त्रास होत आहे.

Exit mobile version