। सुतारवाडी । वार्ताहर ।
सुतारवाडी येथे सुमारे 60 सेंटीमीटर अंतराचा छोटासा पुल आहे. या पुलावरून मुख्य वाहतूक सातत्याने ये-जा करत असून हा पुल सुमारे 70 वर्षांपूर्वी बांधलेला आहे. आता या पुलाला काही ठिकाणी सौम्य तडे गेलेले आहेत. यामुळे आज ना उद्या या ठिकाणाहून प्रवास करणे धोक्याचे होणार असल्याचे येथून प्रवास करणार्या वाहन चालकांकडून बोलले जात आहे.
सुतारवाडी येथील पुलावरून लहान मोठी वाहने त्याचप्रमाणे अवजड वाहने रात्रं दिवस ये-जा करत असतात. तसेच, सुतारवाडी पासून जवळच असलेल्या विळे भागाड या परिसरामध्ये अनेक कंपन्या असून या कंपन्यांमध्ये कच्चा माल नेण्यासाठी त्याचप्रमाणे तयार झालेला माल तेथून इतरत्र देण्यासाठी या पुलावरून प्रवास करावा लागत आहे. या परिसरामध्ये अनेक फार्म हाऊस असल्यामुळे मोठमोठ्या लक्झर्या बसेस पर्यटकांना घेऊन ये-जा करत असतात. यामुळे लवकरात लवकर या पुलाची डागडुजी करणे अत्यंत आवश्यक आहे. जर हा पूल कोसळला तर दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प होऊन शाळा कॉलेजमध्ये त्याचप्रमाणे नोकरीसाठी रोहा-धाटाव येथे जाणार्या विद्यार्थी व नागरिकांचे हाल होतील. यामुळे या पुलाची वेळीच दखल घेणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.