स्वच्छता कर घेऊनही स्वच्छतेचा बोजवारा

रिस-मोहोपाडा येथील व्यापारी आक्रमक
| रसायनी | वार्ताहर |
खालापूर तालुक्यातील सर्वात श्रीमंत समजली जाणारी ग्रामपंचायत वासांबे-मोहोपाडा ग्रामपंचायतीकडून स्वच्छता कर वसूल करण्यात येत असतानाही स्वच्छतेचा बोजवारा उडालेला दिसून येत आहे. ग्रामपंचायत हद्दीत ठिकठिकाणी कचर्‍याचे ढिग पहावयास मिळत आहेत. एकीकडे स्वच्छ भारत अभियाअंतर्गत विविध प्रकल्प राज्य व केंद्र सरकार राबवत असताना ग्रामपंचायत वासांबे व्यापारी वर्गाकडून अन्यायकारक स्वच्छता कर आकारत आहे. हा कचरा व्यापारी वर्गच करीत आहेत का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

ग्रामपंचायत वासांबेने दि. 28/8/2022 रोजी ग्रामसभेमध्ये चर्चा करून ठराव केला आहे, की दांडफाटा ते आंबिवलीतर्फे तुंगारतनपर्यंत रस्त्याच्या बाजूला जे दुकानगाळे व इतर व्यावसायिक दुकाने आहेत त्या दुकानदारांकडून 100 रूपये दर महा स्वच्छता कर आकारण्यात येणार आहेत. यामुळे गरीब लहान व्यापारी, भाजीवाले, फळवाले यांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. ग्रामपंचायत हद्दीत रस्त्यावर सर्रासपणे कचर्‍याचा खच दिसून येत आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीकडे डम्पिंग ग्राऊंड नसून आम्हाला त्याचा भुर्दंड का, असा सवाल व्यापारी करीत आहेत. सात दिवसांच्या आत 100 रूपये स्वच्छता कर बंद न केल्यास रस्त्याच्या बाजूला जे दुकानगाळे व इतर व्यावसायिक दुकाने आहेत त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. सदर कर मागे घेण्यात यावा असे जनता सेक्युलर दलाचे जिल्हा सचिव विजय खारकर यांनी वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी सचिन कुराडे यांना दिलेल्या पत्रकातून म्हटले आहे. यावेळी आकाश कांबळे,अनंता मुंढे आदी उपस्थित होते.

Exit mobile version