चालकाला फिट आल्याने एसटी उलटली

सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

। सोलापूर । वृत्तसंस्था ।

एसटी चालकाला अचानक फिट आल्यामुळे भीषण अपघात झाल्याची घटना सोलापूरमध्ये घडली आहे. बसमध्ये 35 ते 40 प्रवासी होते. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

टेंभुर्णी-कुर्डूवाडी महामार्गावरील पिंपळनेरजवळ आज सकाळी टेंभुर्णीवरून कुर्डूवाडीला जाणाऱ्या बसचा अपघात झाला आहे. बसचालकाला अचानक फिट आल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या बाजूच्या एका शेतात पलटी झाली. या बसमध्ये 35 ते 40 प्रवासी प्रवास करत होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, काही प्रवासी जखमी झाले. जखमींना कुर्डूवाडी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Exit mobile version