आरक्षणामुळे अनेकांच्या मनसुब्यावर पाणी; थेट सरपंचासाठी महिलांसाठी राखीव
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. येथील सदस्य मंडळाची मुदत संपून दोन वर्षाचा कालावधी लोटला असून, आरक्षणाची सोडत काढण्यात आल्याने इच्छुकांची भाऊगर्दी दिसून येत आहे. आरक्षणाच्या सोडतीमुळे जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकीत वरचढ ठरलेल्या कर्जत परिवर्तन आघाडीने पुन्हा आघाडी घेण्याचे इराद्याने हालचाली करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, महायुतीतील पक्षांकडून सध्या सावध पावले टाकली जात असून, निवडणूक चुरशीची होणार हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
रायगड जिल्ह्यातील लोकसंख्येने मोठ्या असलेल्या नेरळ ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणुकीची धुमधाम सुरू झाली आहे. 17 जागांचे आरक्षण जाहीर झाल्याने इच्छुक उमेदवारांचे इरादे स्पष्ट होऊ लागले आहेत. ग्रामपंचायतीतील थेट सरपंच नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव असल्याने माजी सदस्य इच्छुक होण्याची शक्यता आहे. मात्र, सदस्य पदांचे आरक्षण हे अनेक मावळत्या सदस्यांना अन्य ठिकाणी प्रभाग शोधण्याची वेळ आणणारे आहेत.
आदिवासी समाजाचे सर्वाधिक मतदार असलेल्या प्रभाग एकमध्ये दोन जागेवर अन्य समाजातील उमेदवार किंवा आदिवासी समाजातील उमेदवार निवडून येऊ शकतो. प्रभाग दोन मधील तिन्ही जागा सर्वसाधारण झाल्याने येथे सर्वाधिक उड्या पडण्याची शक्यता आहे. तसेच, अन्य प्रभागातील इच्छुकांची गर्दी होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. प्रभाग तीनमध्ये पहिल्यांदाच स्थानिकांच्या हिताचे आरक्षण झाल्याचे दिसून येत आहे. तर, प्रभाग चारमध्ये यावेळी तीन ऐवजी दोनच जागा असल्याने येथे एका सर्वसाधारण जागेवर अनेकांना स्वप्न पडू लागली आहेत. मात्र, कर्जत पंचायत समितीचे सदस्य भगवान चंचे यांचा घरचा वॉर्ड असल्याने परिवर्तन आघाडीचे वजन दिसून येत आहे. प्रभाग पाचमधील विद्यमान महिला सदस्यांना सर्वसाधारण जागा राहिली नसल्याने दुसऱ्या प्रभागात जाऊन निवडणूक लढवावी लागू शकते. या प्रभागातील तिन्ही जागा आरक्षित असल्याने सर्वसाधारण गटातील इच्छुक कदाचित या आरक्षणाला हरकत घेऊ शकतात. मात्र, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती मधील आरक्षणावर फारसा बदल होण्याची शक्यता कमी आहे. प्रभाग सहामध्ये देखील एका विद्यमान सदस्याला अन्य ठिकाणी जाऊन निवडणूक लढवावी लागू शकते. तर, यावेळी अनुसूचित जमातीमधील तीन जागा आदिवासी बहुल भागापेक्षा अन्य भागातील प्रभागातही आरक्षण जाहीर झाल्याने यावेळी तीन आदिवासी आरक्षित जागांशिवाय आणखी आदिवासी उमेदवार ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी होऊ शकतात.
या निवडणुकीत राजकीय पक्षांचे प्रमुख पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात येऊ शकतात. त्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष आणि शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख प्रभाग पाचमधून, शेकाप शहर चिटणीस, मनसे शहर अध्यक्ष, शिवसेना शिंदे गट तालुका उप प्रमुख, आझाद हिंद पार्टी प्रभाग प्रभाग दोनमधून, तर युवासेनेचे पदाधिकारी प्रभाग दोन आणि सहामधून तसेच भाजप मंडळ महिला अध्यक्ष थेट सरपंचपदासाठी, शिवसेना शिंदे गट शहर प्रमुख अन्य एका प्रभागातून, तर याशिवाय काही माजी सदस्य पुन्हा लढण्यासाठी तयारीला लागले आहेत. यावेळी सर्वसाधारण जागा दहा असून, त्यातील चार जागा महिलांसाठी राखीव आहेत. त्यामुळे त्या सर्वसाधारण जागांवर बहुसंख्य उमेदवारांचे डोळे लागून राहिले आहेत. अशावेळी राजकीय पक्ष घराणेशाही कायम ठेवतात की मोडून काढून कार्यकर्त्यांना संधी देतात? याकडे देखील सर्वसामान्य कार्यकर्ते यांचे विशेष लक्ष असणार आहे.







