। तळा । प्रतिनिधी ।
तळा तालुक्यातील तारस्ते येथे विजेचा शॉक लागून मृत पावलेल्या तीन बैलांची सात महिन्यांनंतरही नुकसान भरपाई मिळालेली नसल्याने संबंधित शेतकरी आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तळा तालुक्यातील मौजे तारस्ते येथील धर्मा रामा भौड यांचे दोन बैल व अशोक तुकाराम मोरे यांचा एक बैल हे दि. 20 ऑक्टोबर 2025 रोजी मौजे मांदाड गावच्या हद्दीत चरण्यासाठी गेले होते. यावेळी महावितरण विभागाच्या विद्युत खांबावरील तुटलेल्या तारेचा शॉक लागून तिन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी उपकार्यकारी अभियंता, महावितरण विभाग तळा यांच्याकडे अर्ज करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली आहे. मात्र, घटनेला सात महिन्यांचा कालावधी उलटूनही अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. याबाबत महावितरण विभागाकडून सर्व प्रकरणांचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आला असून, तेथून निधी उपलब्ध झाल्यानंतर मदत दिली जाईल, असे सांगण्यात आले आहे. मात्र, सात महिने उलटूनही भरपाई न मिळाल्याने “आम्हाला मदत मिळणार तरी कधी?” असा प्रश्न दोन्ही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.







