उपजिल्हा रुग्णालयाची क्षमता वाढणार

200 खाटांचा प्रस्ताव राज्य आरोग्य विभागाकडे
। पनवेल । वार्ताहर ।

पनवेल ग्रामीण आणि महापालिका हद्दीतील वाढत्या रुग्णांचा भार सांभाळण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयाची क्षमता 200 खाटांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन संकपाल यांनी जिल्हा आरोग्य शल्य चिकित्सकांमार्फत राज्य आरोग्य विभागाकडे पाठवला आहे. त्यामुळे आरोग्य सेवेला बळकटी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

पनवेलकरांना सवलतीच्या दरात सुविधा देण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय सोडले तर एकही सरकारी रुग्णालय नाही. महापालिकेचेही स्वतःच्या मालकीचे रुग्णालय नाही. अशा परिस्थितीत शहर आणि महापालिका हद्दीतील सिडको वसाहतींमधील गरीब-गरुजूंना उपजिल्हा रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागते.

उपजिल्हा रुग्णालयातील 120 खाटा रुग्णांच्या प्रमाणासमोर कमी पडत असल्याने अनेकदा खासगी रुग्णालयांमध्ये जावे लागते. त्याचा गैरफायदा घेत रुग्णांकडून अवाच्या सव्वा पैसे आकारले जात आहेत. अशातच तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांना इतर आजारांवरील वैद्यकीय सुविधा देण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयातील खाटांची क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे भविष्यात या रुग्णालयावरील वाढता भार लक्षात घेता जिल्हा आरोग्य विभागाकडून अतिरिक्त 200 खाटांचा प्रस्ताव राज्य आरोग्य विभागाकडे पाठवण्यात आला आहे.

अतिरिक्त सुविधा
रुग्णालयात सध्या प्रसूती व शस्त्रक्रिया, नसबंदी, लहान मुलांवरील हार्निया आणि त्याच्याशी संबंधित इतर आजारांवरील शस्त्रक्रिया केल्या जातात. दररोज 10 ते 12 रुग्णांचे डायलिसिस होते. त्यामुळे रुग्णालयात अतिरिक्त 200 खाटांची व्यवस्था झाल्यास रुग्णालयामध्ये डॉक्टर आणि पॅरामेडीकल्स स्टाफची अतिरिक्त फौजदेखील उपलब्ध होणार आहे.

पनवेल उपजिल्हा रुग्णालयातर्फे 120 खाटांच्या माध्यमातून विविध वैद्यकीय सुविधा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवल्या जातात. मात्र आता पनवेल शहराभोवती होणारा विकास आणि लोकसंख्या पाहता 200 खाटांपर्यंत क्षमता वाढवण्याबाबत प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे.

– डॉ. सचिन संकपाल, वैद्यकीय अधीक्षक, पनवेल उपजिल्हा रुग्णालय
Exit mobile version