| पनवेल | वार्ताहर |
पनवेल तालुकयातील हरिग्राम रो-हाऊस समोर उभी करून ठेवलेल्या हुंडाई इऑन एरा गाडीची चोरी केल्या प्रकरणी पनवेल पोलिसांनी अवघ्या 24 तासात एका आरोपीला गजाआड केले आहे व त्याच्या कडून चोरीची गाडी हस्तगत केली आहे.
विद्या गुजर यांनी त्यांची एक लाख रुपये किमतीची सफेद रंगाची हुंडाई इऑन एरा (एमएच-12-एनपी-9104) ही तालुकयातील हरिग्राम-माथेरान रोड येथील रो-हाऊस समोर उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने सदर गाडी चोरून नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या तक्रारी नुसार वरीष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे विभागाचे सहाय्यक पोलीस संजय गळवे, पोलीस हवालदार विजय देवरे, पोलीस हवालदार महेश धुमाळ, पोलीस हवालदार सुनिल कुदळे, पोलीस शिपाई आकाश भगत आदींच्या पथकाने गुप्तबातमीदार, तांत्रिक तपास व सी.सी.टीव्ही फुटेज आधारे शोध घेतला. सदर आरोपी मयुर प्रदास मोरे, (28 ) रा. सुकापूर हा चोरीच्या गाडीसह पनवेल परिसरात असल्याचे आढळून आल्याने सदर आरोपीस सापळा रचून गाडीसह ताब्यात घेतले आहे. त्याच्या अटकेमुळे पनवेल परिसरातील इतर गाडी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.







